धक्कादायक; जीएसटीच्या राज्यकर अधिकाऱ्यासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

bribe
bribe

सांगली - वस्तू व सेवा कर विभागातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी राजेंद्र महालिंग खोत (वय 57) याच्यासह कर सहायक शिवाजी महादेव कांबळे (वय 32) या दोघांना चाळीस हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. सांगली-मिरज रस्त्यावरील जीएसटी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाने ही कारवाई केली. मुल्यवर्धीत करातील त्रुटी दूर करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. दरम्यान, जीएसटी विभागात प्रथमच ही घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

अधिक माहिती अशी, तक्रारदार यांच्या पत्नीचे कवठेमहांकाळ येथे बसवेश्‍वर इंडस्ट्रीज आहे. त्याठिकाणी फर्निचर तयार केले जाते. या कारखानाच्या मागील तीन वर्षाचा मल्य वर्धीत कर मार्च 2019 मध्ये ऑनलाईन पद्धतीने भरलेला होता. जीएसटी कार्यालयातील राजेंद्र खोत व शिवाजी कांबळे यांनी तक्रारदार यांना फोन लावला. मुल्य वर्धीत करात त्रुटी निघण्याची शक्‍यता आहे. तुम्ही एक लाख रूपये द्या, म्हणजे तुमच्या करामध्ये आम्ही त्रुटी काढणार नाही, असे म्हणून लाचेची मागणी केली. 

तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. त्यानुसार पडताळणी करण्यात आली. राजेंद्र खोत यांच्या सांगण्यावरून शिवाजी कांबळे याने तक्रारदार यांच्याकडे 70 हजार रूपये मागणी केली. चर्चेअंती 60 हजार रूपये घेवून येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जीएसटी विभागात सापळा रचला. राजेंद्र खोत यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम शिवाजी कांबळे याच्याकडे देण्यास सांगितले. शिवाजी कांबळे याने चाळीस हजार रूपये स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दोघांविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अधिनाथ बुधवंत, निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, संजय कलकुटगी, अविनाश सागर, जितेंद्र काळे, भास्कर भोरे, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, राधिका माने, सारिका साळुंखे-पाटील, अश्‍विनी कुकडे, बाळासाहेब पवार यांचा कारवाईत सहभाग होता. 

टोल फ्री क्रमांक... 
शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार द्यावी, असे आवाहन निरीक्षक गुरूदत्त मोरे यांनी केले आहे. 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधु शकता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com