सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी केला दुष्काळ पाहणी दौरा

karkamb
karkamb

करकंब : आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पंढरपूर तालुक्यातील बार्डी व करकंब येथील काही शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन दुष्काळामुळे करपून गेलेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, सभापती राजेंद्र पाटील, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका कृषी अधिकारी आर. डी. चंदनशिवे, प्रांताधिकारी सचिन ढोले, गटविकासअधिकारी रविकिरण घोडके  माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, श्रीकांत बागल, पंचायत समिती सदस्य राहुल पुरवत, सरपंच आदिनाथ देशमुख, अभिजित कवडे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बार्डी येथील शिवाजी शिंदे यांच्या तुरी,  गोविंद अंबुरे, विठ्ठल अंबुरे यांच्या मका, तर करकंब येथील संदीप शिंगटे यांची पपई ची बाग, नागनाथ चेडे यांची मका, भारत चेडे यांची तूर या जळालेल्या पिकांची पाहणी करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून उपलब्ध जलस्रोतांची माहिती घेतली असता सध्या उपलब्ध असणाऱ्या बोअर आणि विहिरींमधून पिण्याइतपत ही पाणी मिळत नसून पिण्यासाठी टँकर चालू करावेत व हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळावे. शिवाय जनावरांसाठी चारा डेपो अथवा चारा छावण्या चालू कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यानी केली.

यावेळी संदीप शिंगटे यांनी अडीच एकर पपईच्या बागेसाठी सवा लाख रुपये खर्च केला असून चालू बाजार भावाप्रमाणे दहा लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित होते . मात्र पाऊसच पडला नसल्याने पाण्याअभावी आता बाग सोडून द्यावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

करकंब पाणीपुरवठा योजनेच्या पाणी साठवण तलावाचे काम वर्षानुवर्षे रखडले असल्यामुळे ठेकेदारांच्या विरोधात बाळासाहेब देशमुख, राहुल पुरवत, आदिनाथ देशमुख, आदींनी तक्रारी केल्या. त्यात तथ्य असल्याचा दुजोरा आमदार बबनदादा शिंदे आणि प्रशांत परिचारक यांनी दिला. त्यावर तत्काळ पालकमंत्री देशमुख जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दूरध्वनी करून या संदर्भात शुक्रवारी विशेष बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय येथील कृत्रिम पाणीटंचाई टाळण्यासाठी टँकचे काम थांबवून डाव्या कालव्याला उजनीचे आवर्तन सुटल्यावर टॅंक भरून घेण्याच्या सूचना दिल्या.

बार्डी येथे दोनशे दहा हेक्टर वनक्षेत्र असून यामध्ये दोनशेहून अधिक वनगायी, हरीण, काळवीट आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे. त्यांच्याही चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हे प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असून शेतकऱ्याची उभी पिके रातोरात खाऊन फस्त करत आहेत याकडे बार्डी येथील बाधित शेतकऱ्यानी पालकमंत्रांचे लक्ष वेधले असता वन्य प्राण्याच्या चारापाण्याची व्यवस्था करण्याबाबत श्री. देशमुख यांनी सूचना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com