पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - रा. काँ. जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

'युवक राष्ट्रवादी'चे माजी जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात व युवा कार्यकर्ते राकेश राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज 'जामखेड बंद' पाळण्यात आला.

जामखेड - जामखेडला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा गोळीबार झाला. त्यात युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना प्राणाला मुकावे लागले. कायदा-सुव्यवस्था राखण्यात पालकमंत्री राम शिंदे अपयशी ठरले आहेत. त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली. 

'युवक राष्ट्रवादी'चे माजी जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात व युवा कार्यकर्ते राकेश राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज 'जामखेड बंद' पाळण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना घुले म्हणाले, "जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. जामखेडला तर कहरच झाला. कोणत्याच कार्यालयात नियमित अधिकारी नाहीत. येथे तीन वर्षांत 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. आता प्रभारी पोलिस निरीक्षक आहेत. ही बाब पालकमंत्र्यांना स्वतःचा मतदारसंघ म्हणून अशोभनीय आहे. राळेभात बंधूच्या हत्याकांडातील सर्व अरोपींना गजाआड करेपर्यंत बेमुदत "जामखेड बंद' आंदोलन कायम राहिल.'' 

'राष्ट्रवादी'चे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे म्हणाले, "पक्षाच्या दोन तरुणांची झालेली निर्घृण हत्या सामाजिकतेला काळीमा फासणारी घटना आहे. एकेकाळी शांत समजले जाणारे जामखेड अशांत झाले आहे. दिवसाढवळ्या गोळीबार होतो, ही बाब बिहारच्या दिशेने जाणारी आहे. त्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे.'' 

प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, "पालकमंत्री शिंदे यांच्यामुळेच जामखेडची कायदा-सुव्यवस्था बिघडली. त्यांनी तालुक्‍यात निर्माण केलेले 'प्रभारीराज' त्यासाठी कारणीभूत आहे. या गुन्ह्यात निष्पन्न झालेला आरोपी गोविंद गायकवाड याने तीन आठवड्यांपूर्वी लोणी (ता. जामखेड) येथेही गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत जामखेड पोलिसांत गुन्हाही दाखल झाला. मात्र, पोलिसांनी त्याच्याकडील पिस्तूल खेळणीतील असल्याचे सांगून आरोपीला सोडून दिले. त्याच वेळी कडक शासन झाले असते, तर हे दुहेरी हत्याकांड झाले नसते. लोणी गोळीबाराची चौकशी करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यास निलंबित करावे.'' 

सर्वपक्षीय शांतता कमिटीची बैठक उद्या (सोमवारी) महावीर मंगल कार्यालयात घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे अॅड. अरुण जाधव यांनी सांगितले. या वेळी राजेंद्र फाळके, दत्तात्रेय वारे, डॉ. भास्कर मोरे, राजेंद्र कोठारी, शरद शिंदे, बाळासाहेब पवार, अॅड. अरुण जाधव, अॅड. बंकटराव बारवकर आदी उपस्थित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The Guardian Minister should resign says NCP district president ghule