गुडेवारांनी दिला दणका अन्‌  ते 95 हजार रुपयांसह दारात, काय आहे प्रकरण वाचा ! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याचा एक इशाराही किती परिणामकारक असतो याचा प्रत्यक्ष या सांगली जिल्हा परिषदेत आला. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी "त्याच्यावर गुन्हा दाखल करा', असा फक्त इशारा दिला आणि नडलेला व्यक्ती 95 हजार रुपये परत करायला दारात येऊन उभा राहिला.

सांगली ः एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याचा एक इशाराही किती परिणामकारक असतो याचा प्रत्यक्ष या सांगली जिल्हा परिषदेत आला. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी "त्याच्यावर गुन्हा दाखल करा', असा फक्त इशारा दिला आणि नडलेला व्यक्ती 95 हजार रुपये परत करायला दारात येऊन उभा राहिला. मिरज तालुक्‍यातील दूधगाव येथे ही घटना घडली. 

गेल्यावर्षी आलेल्या महापुरात दुधगावातील अनेकांच्या घरांचे नुकसान झाले, घरे पडली. एका लाभार्थीला किरकोळ नुकसानीचे सहा हजार रुपये मिळाले. त्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीचे संपूर्ण घर पडले होते. त्याला 95 हजार रुपयांची रक्कम मिळणार होती. काही तांत्रिक चुका झाल्या आणि बॅंकेतून त्याच नावाच्या, मात्र चुकीच्या व्यक्तीच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली. दुसऱ्या लाभार्थीने त्याबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केली. एका लाभार्थीच्या बॅंक खात्यावर दोघांची रक्कम जमा झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानंतर अनुदानासाठी पात्र लाभार्थीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली. त्या लाभार्थीला ग्रामपंचायतमध्ये बोलावून सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्याबाबतची कल्पना दिली. 

त्यावेळी चुकून लाभ मिळालेल्या लाभार्थीने पैसे परत भरतो, असे सांगितले, मात्र पुन्हा टाळाटाळ सुरु केली. ग्रामपंचायत प्रशासनाने त्याला पैसे परत करण्याबाबत 5 मे रोजी पहिली तर 30 जूनला दुसऱ्यांदा नोटीस बजावली. त्या लाभार्थीने दोन्ही नोटीसीला कोणतीही दाद दिली नाही. बोगस अनुदान घेवून रक्कम परत न केल्याने संबंधित लाभार्थीच्या घरावर बोजा नोंद करण्यासह गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी गुडेवार यांनी मिरजेच्या गटविकास अधिकाऱ्यांना बुधवारी दिले होते. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून आळ्या. गुडेवारांच्या दणक्‍याने गुरुवारीच त्या लाभार्थीने 95 हजाराची रक्कम ग्रामपंचायतमध्ये भरली. ती रक्कम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे जमा केली जाईल, असे ग्रामसेवक बसगोंडा पाटील यांनी सांगितले. आता ही रक्कम मूळ लाभार्थीला मिळण्याची प्रक्रिया सुरु होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gudewar knocked on the door with Rs 95,000, read the case!