स्केटिंगपटू अभिषेक नवलेची गिनीज बुकमध्ये नोंद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 December 2020

स्केटिंगपटू अभिषेक नवले याने १०० मीटर जलद इनलाईन स्केटिंगमध्ये नवा विक्रम केला.

बेळगाव : स्केटिंगपटू अभिषेक नवले याने १०० मीटर जलद इनलाईन स्केटिंगमध्ये नवा विक्रम केला. त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली. १८ नोव्हेंबर रोजी त्याने १२.९७ सेकंद इतका अवधी घेत १०० मीटर इनलाईन स्केटिंग पूर्ण केले होते. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड सॅलिस्बरीने १३.२५ सेकंद इतका अवधी घेत नोंदविला होता.

अभिषेक १४ वर्षांपासून स्केटिंगचा सराव करीत आहे. त्याने पोर्तुगाल येथे झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांत तीन वेळा रेकॉर्ड, दोन वेळा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, कर्नाटक राज्य पुरस्कार २०१४, राष्ट्रीय पुरस्कारासाठी मानांकन अशा अनेक स्पर्धेत भाग घेतला आहे. बंगळूर ते बेळगाव ही ५४० किमी स्केटिंग रॅली, बेळगाव ते दिल्ली अशी दोन हजार किमीची रॅली त्याने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्याला स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीचे अध्यक्ष उमेश कलघटगी व पालकांचे प्रोत्साहन लाभले.

हेही वाचा- वासोटा ट्रेकसाठी निघालेले इस्लामपूरचे आठ युवक जखमी -

 केएलई स्केटिंग रिंकवर नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात विजयकुमार पाटील, प्रवीण हिरेमठ, विजया हिरेमठ, सायनेकर, बी. एस. बिडनाळ, अनिता, जिम प्रशिक्षक अभिषेक जाधव, डॉ. हलगी, योगेश कुलकर्णी, प्रशिक्षक हिडलगेकर यांच्या हस्ते अभिषेकचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी, रोटरी कार्पोरेशन स्पोर्टस अकादमी, रोटरी क्‍लब ऑफ वेणुग्राम, केएसआरटीसी कर्मचारी, युनियन क्‍लब बेळगाव, एस. के. इंटरनॅशनल स्पोर्टस अकादमीचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guinness Book of World Record 2020 for skater Abhishek Navale