महापुराचे पाणी घरात; अन् गुरव कुटुंबासमोर संकटांचा डोंगर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

‘‘महापुराचं पाणी घरात शिरलं. घरातील साहित्य नष्ट झालं. पूर ओसरला. घराची भिंतही ढासळली. घराची साफसफाई करताना आईला सर्पदंश झाला. तिला रुग्णालयात दाखल केले. पुरामुळे निवारा केंद्रात राहताना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले. माझी आणि आईची सेवा करताना पत्नीही आजारी पडली. तिलाही रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. आईने प्रकृती ठीक झाल्या झाल्या डिस्चार्ज घेतला. मीही बरा झालो. आता घर सावरायचं, मदत घ्यायची, असं ठरवलं; मात्र पुन्हा आईची प्रकृती बिघडली. तिला सीपीआरमध्ये दाखल केले.

कोल्हापूर - ‘‘महापुराचं पाणी घरात शिरलं. घरातील साहित्य नष्ट झालं. पूर ओसरला. घराची भिंतही ढासळली. घराची साफसफाई करताना आईला सर्पदंश झाला. तिला रुग्णालयात दाखल केले. पुरामुळे निवारा केंद्रात राहताना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले. माझी आणि आईची सेवा करताना पत्नीही आजारी पडली. तिलाही रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. आईने प्रकृती ठीक झाल्या झाल्या डिस्चार्ज घेतला. मीही बरा झालो. आता घर सावरायचं, मदत घ्यायची, असं ठरवलं; मात्र पुन्हा आईची प्रकृती बिघडली. तिला सीपीआरमध्ये दाखल केले. तिच्या देखभालीसाठी आम्हालाही येथेच राहावं लागलं. घर सोडा, आता आईच्याच प्रकृतीची चिंता आहे.’ महापुरानंतर संकटांचा पूर झेलणाऱ्या करनूर (ता. कागल) येथील प्रमोद गुरव यांची ही कथा आहे.

करनूर येथे प्रमोद कुटुंबासोबत राहतात. ते, एमआयडीसीत नोकरी करत होते. मंदीमुळे ते सध्या घरीच असतात. आई मंगल गुरव अंगणवाडी सेविका होत्या. सध्या त्यांच्याही हाताला काम नाही. महापुराचं पाणी चार ऑगस्टला त्यांच्या घरात शिरलं. प्रापंचिक साहित्यच नव्हे तर कागदपत्रेही बाहेर काढण्याचीही संधी मिळाली नाही. आई, वडील, पत्नीसह मुलाला घेऊन त्यांनी एका खासगी निवारा केंद्रात आसरा घेतला. अशा परिस्थिती त्यांची प्रकृती बिघडल्याचे त्यांना जाणवत होत.

आठ दिवसानंतर पूर ओसरला. त्यांची आई घाईघाईने घराची स्वच्छता करायला गेली. घरात पाय टाकल्या टाकल्या तिला सर्पाने दंश केला. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिच्या सेवेसाठी ते रुग्णालयात थांबून होते. त्यावेळी त्यांची प्रकृतीही अधिकच खालावली. डॉक्‍टरांनी त्यांची तपासणी केली. त्यात त्यांना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनाही डॉक्‍टरांनी तातडीने रुग्णालयात दाखल करून घेतले. त्या दोघांची सेवा करताना त्यांची पत्नी देवयानीही आजारी पडली. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू झाले. याकाळात घराचं काय झाल हे पाहण्याचीही संधी गुरव कुटुंबाला मिळाली नाही.

घर कधी सावरायचं!
गुरव यांच्यासह त्यांच्या आईची प्रकृती सुधारली. त्यांनी तातडीने घराच्या साफसफाईची तयारी सुरू केली; पण त्यांना सर्पदंशामुळे पुन्हा वेदना होऊ लागल्या. त्यांना प्रमोद यांनी सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांच्या बरोबर ते, पत्नी  सीपीआरमध्ये आहेत. घर सावरायचं कधी, शासकीय मदत घ्यायला जायचं कधी, कागदपत्रे द्यायची कशी, असे दिव्य प्रश्‍न त्यांच्यासमोर उभे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gurav family flood suffer special story