गुरुजी सरसावले, उभारले कोविड केअर सेंटर 

अजित झळके
Thursday, 10 September 2020

पहिल्या टप्प्यात 20 बेडचे हे सेंटर चालवले जाणार असून त्यात प्राथमिक पातळीवर ऑक्‍सिजन पुरवठा, नियमित उपचार आणि देखभाल केली जाणार आहे. देशातील शिक्षकांनी उभारलेले हे पहिले कोविड सेंटर असल्याचे मुख्य प्रवर्तक व शिक्षक समितीचे नेते विश्‍वनाथ मिरजकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

सांगली ः "गुरुविन कोण दाखविल वाट', असे म्हटलं जातं. शिक्षक हा समाज घडविणारा घटक मानला जातो. कोरोना संकट काळातही शिक्षकांनी आपल्या परीने योगदान देत "कोविड योद्धा' म्हणून काम सुरु ठेवले आहे. आता तर जिल्ह्यातील शिक्षकांनी पुढाकार घेत चक्क कोविड केअर सेंटर सुरु केले आहे. मिरज येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्याचे उद्‌घाटन होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू असे या सेंटरचे नाव असून डॉ. आंबेडकर उद्यानाजवळील डॉ. नईम शेख यांच्या जुन्या रुग्णालयात हे सेंटर चालवले जाणार आहे. 

पहिल्या टप्प्यात 20 बेडचे हे सेंटर चालवले जाणार असून त्यात प्राथमिक पातळीवर ऑक्‍सिजन पुरवठा, नियमित उपचार आणि देखभाल केली जाणार आहे. देशातील शिक्षकांनी उभारलेले हे पहिले कोविड सेंटर असल्याचे मुख्य प्रवर्तक व शिक्षक समितीचे नेते विश्‍वनाथ मिरजकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंक आणि शिक्षक समितीने जिल्ह्यात शिक्षकांचे सहकारी तत्त्वावरील रुग्णालय उभारण्याचा संकल्प गेल्यावर्षी केला. त्याच्या सर्व मान्यता घेण्यासाठी प्रक्रिया सुरु केली. जागेचा शोध सुरु झाला. तोवर कोरोना संकट आले आणि काम थांबले. आता मात्र तीच संकल्पना प्राथमिक टप्प्यावर एक कोविड केअर सेंटर म्हणून पुढे आली. त्याला डॉ. नईम शेख यांनी हात दिला आणि आपली तीन मजली इमारत देऊ केली. डॉ. विक्रम कोळेकर यांच्या टीमने त्याची धुरा खांद्यावर घेतली. या सेंटरचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र कांबळे आणि उपाध्यक्ष म्हणून अजित पाटील यांच्याकडे धुरा सोपवली. किरण गायकवाड आणि शशिकांत भागवत या ज्येष्ठ शिक्षकांनी पायाला भिंगरी लावून सेंटर उभारणी सुरु केली. त्याला आता मूर्त रूप आले आहे, असे श्री. मिरजकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते आणि सीईओ जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या उपस्थितीत सोहळा होणार आहे. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड उपस्थित होते. 

सर्व संघटनांना पुढे यावे 

""शिक्षक समितीचा यात पुढाकर आहे, मात्र हे एका संघटनेचे नाही तर हे संपूर्ण शिक्षकांचे रुग्णालय आहे. त्यामुळे शिक्षक संघासह सर्व छोट्या मोठ्या संघटनांना यात सहभागी व्हावे. लोकसेवेसाठीचा हा यज्ञ आहे.'' 

विश्‍वनाथ मिरजकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guruji Sarasavale, erected Kovid Care Center