कर्नाटकातून शिर्डीकडे जाणारा 51 लाखांचा गुटखा जप्त 

तात्या लांडगे
मंगळवार, 30 जुलै 2019

वाहनचालकाकडे चौकशी केली असता त्याने गाडीत रसायन असल्याची पावती दाखवली. मात्र, पोलिसांनी गाडीची पडताळणी केली तर गाडी गुटख्याने भरल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चालकासह गाडी जप्त केली. 

सोलापूर : गाडीत रसायन वाहून नेत असल्याची पावती ड्रायव्हरकडे देऊन कर्नाटकातून तब्बल 50 लाख 96 हजारांचा गुटखा घेऊन ट्रक शिर्डीकडे निघाली. पोलिसांना चकवा देत गाडी कर्नाटकातून मोहोळपर्यंत आली. मात्र, गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ पोलिसांनी ट्रक अडवली. वाहनचालकाकडे चौकशी केली असता त्याने गाडीत रसायन असल्याची पावती दाखवली. मात्र, पोलिसांनी गाडीची पडताळणी केली तर गाडी गुटख्याने भरल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी चालकासह गाडी जप्त केली. 

गाडीतून रॉयल 717 टोबॅको 140 पोती (किंमत 14 लाख रुपये), हिरा पानमसाला लहान-मोठा 280 पोती (किंमत 36.96 लाख) हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, अन्न सुरक्षा अधिकारी योगशे देशमुख, उमेश भुसे यांनी पोलिसांना या कारवाईत मदत केली. हा गुटखा शिर्डी (जि. नगर) येथील काही व्यापाऱ्यांचा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा गुटखा कुठून आला, कधीपासून अशी चोरटी वाहतूक सुरु आहे, महाराष्ट्रात गुटखा बंदी असतानाही शिर्डीतून कोणते व्यापारी कधीपासून गुटखा कर्नाटकातून आणत आहेत, याची माहिती पोलिस घेत आहेत. पोलिसांनी ट्रकचालक पप्पू श्रीजग्गा पाल (वय-36 रा. लुसा, जि. मिर्झापूर, उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेतले आहे. 

गुप्तहेरामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ-कामती रोडवर गुटखा घेऊन जाणारे वाहन अडवले. कागदपत्रांची पाहणी केली मात्र, त्याकडे गाडीत रसायन असल्याची पावती होती. गाडीची पडताळणी केली असता तब्बल 51 लाखांचा गुटखा सापडला. त्यानुसार ट्रकचालकासह वाहन ताब्यात घेतले आहे. 
- सूर्यकांत कोकणे, पोलिस निरीक्षक, मोहोळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha of 51 lakhs seized by police at solapur