टेम्पोचा केला पाठलाग अन्‌... सापडला 20 लाखांचा गुटखा

घनशाम नवाथे 
Saturday, 12 December 2020

मिरज ग्रामीण हद्दीत विजयनगर येथे काही दिवसापूर्वी सापडलेल्या बेकायदेशीर गुटख्याचे सांगली कनेक्‍शन आज स्पष्ट झाले.

सांगली : मिरज ग्रामीण हद्दीत विजयनगर येथे काही दिवसापूर्वी सापडलेल्या बेकायदेशीर गुटख्याचे सांगली कनेक्‍शन आज स्पष्ट झाले. प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या पथकाने येथील मार्केट यार्डात नरेश नानवाणी याच्या गोदामावर छापा टाकला. छाप्यात तब्बल 20 लाखांचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला. नानवाणी याच्यासह टेम्पो चालक अकबर शेख याला अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मिरज ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील विजयनगर येथे गुटखा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशिक्षणार्थी अधीक्षक मिरखेलकर यांच्या पथकाने तेथे चौकशी केली. त्यानंतर एका घरात छापा टाकून गुटखा साठा जप्त केला. याप्रकरणी एकास ताब्यात घेऊन, त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगलीतून गुटखा खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार श्री. मिरखेलकर यांनी पोलिस पथकाच्या सहाय्याने कसून चौकशी सुरू केली होती. 

दरम्यान, आज एक टेम्पो (एमएच 10 एक्‍यू 62 51) मिरजेकडून सांगलीकडे जात होत. संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. चालक अकबर शेख याने ही गाडी थेट मार्केट यार्डातील वसंतदादा शेतकरी बॅंकेजवळ असलेल्या नानवाणी यांच्या गोदामात नेली. यानंतर पोलिस पथकाने गोदामावर छापा टाकला. यावेळी बंदी असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू भरून पोती गोदामात साठवल्याचे आढळले.

मिरज ग्रामीण पोलिसांच्या मदतीने टेम्पोव गोदामातील गुटखा व सुगंधी तंबाखू यांची मोजदाद सुरू होती. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत तब्बल 20 लाखांचा गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आला. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. या कारवाईची सांगली आणि परिसरात चर्चा रंगली होती. तसेच प्रशिक्षणार्थी अधीक्षक मिरखेलकर यांच्या कारवाईचे कौतुक होत होते. 

अन्न व औषधचे दुर्लक्ष 
बंदी असलेल्या गुटख्यावर कारवाईचे अधिकार असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने राजरोस दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणात गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा करून त्याची विक्री होत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha worth Rs 20 lakh was found in Sangali