"ते' टपलेत मृतदेहासाठी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

अमरधाम स्मशानभूमीत रविवारी (ता. एक) सुमारे 14 ते 15 जणांचे अंत्यविधी झाले. अंत्यविधीसाठी ओटे कमी पडल्याने काहींवर अंत्यसंस्कार खालीच करण्यात आले. आज सकाळी काही नागरिक सकाळी दशक्रिया विधीसाठी आले, तेव्हा भटकी कुत्री अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर ओढत होती.

नगर ः अमरधाम स्मशानभूमीत अर्धवट जळालेला मृतदेह भटक्‍या कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढला. परिसरातील नागरिकांनी कुत्र्यांच्या तावडीतून तो सोडवला आणि पुन्हा अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे अमरधाममधील सुरक्षा, सुविधेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमरधाममध्ये सातत्याने मृतदेहांची विटंबना होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 

हेही वाचा मी ती नव्हेच... ती दुसरी आहे

अमरधाम स्मशानभूमीत रविवारी (ता. एक) सुमारे 14 ते 15 जणांचे अंत्यविधी झाले. अंत्यविधीसाठी ओटे कमी पडल्याने काहींवर अंत्यसंस्कार खालीच करण्यात आले. आज सकाळी काही नागरिक सकाळी दशक्रिया विधीसाठी आले, तेव्हा भटकी कुत्री अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर ओढत होती. नागरिकांनी तत्काळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, तर काहींनी पोलिसांना कळविले. 

स्थानिकांनी तत्काळ धाव घेतली 
ही माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने स्थानिक तरुणांनी तेथे धाव घेतली. त्यांनी तातडीने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. भटकी कुत्री, मोकाट जनावरांचा परिसरात मोठ्या प्रमाणावर वावर आहे. त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

आवश्‍य वाचा लोणीतील गोळीबारात तरुणाचा मृत्यू 

सुविधेची कामे तातडीने करा 
अमरधामातील ही घटना कळताच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तातडीने विद्युत विभाग, आरोग्य विभाग व उद्यान विभागाची बैठक घेतली. अमरधामातील सोयी-सुविधांबाबत मंजूर असलेली 40 लाखांची कामे तातडीने सुरू करण्याचा आदेश दिला. तेथील बंद असलेली विद्युतदाहिनीही तातडीने सुरू केली जाईल, विद्युतदाहिनीसाठी पूर्वी 1200 रुपये शुल्क आकारले जात होते; आता 900 रुपये आकारण्यात येतील, असेही वाकळे यांनी सांगितले. 

हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई 
""अमरधाम स्मशानभूमीच्या परिसरात पुन्हा मोकाट जनावरे, भटकी कुत्री दिसल्यास तेथे नियुक्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, ज्या कर्मचाऱ्यांना कामे करायची नाहीत, ज्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायची आहे, अशा कर्मचाऱ्यांचे स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज तातडीने मंजूर करावेत,'' अशा सूचना महापौर वाकळे यांनी उद्यान विभागप्रमुखांना दिल्या. उपमहापौर मालन ढोणे, उपायुक्त सुनील पवार, डॉ. प्रदीप पठारे, उद्यान विभागाचे शशिकांत नजान, विद्युत विभागाचे पी. एल. शेंडगे, अजय चितळे आदी या वेळी उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half-burnt dead body in Amardham Cemetery