पंढरपुरात विष्णूपदावर अर्धाफूट पाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

- मार्गशिर्ष महिनाभर विठूरायाचा मुक्काम चंद्रभागा नदीतील श्री विष्णुपद मंदिरात असतो अशी अख्यायिका 

- विष्णू पदावर भगवान श्रीकृष्णाची दोन प्रकारची पावले असल्याचे सांगितले जाते

- मंदिराच्या चारही कोपऱ्यात गाईंच्या खुरांची चिन्हे असल्याचे दाखवले जाते

- मंदिर 30 फूट लांब 30 फूट रुंद असून उंची सुमारे बारा फूट आहे

पंढरपूर : मार्गशिर्ष महिन्यात सावळा विठुराया नेहमीच्या देवळात नसतो. संपूर्ण मार्गशिर्ष महिनाभर विठूरायाचा मुक्काम चंद्रभागा नदीतील श्री विष्णुपद मंदिरात असतो अशी अख्यायिका आहे. या मंदिराकडे नदीतून होडीने जाता येते. चालत जाण्यासाठी दगडी पुल देखील आहे. त्यामुळे संपूर्ण मार्गशिर्ष महिनाभर हजारो भाविक होडीतून अथवा चालत श्री विष्णुपद मंदिरात दर्शनासाठी जातात. सध्या चंद्रभागा नदीची पातळी वाढलेली असल्याने श्री विष्णुपद मंदिरात जिथे भगवान श्रीकृष्णाच्या पायांचे ठसे आहेत असे सागितले जाते त्या भागावर सुमारे अर्धा फूट पाणी आहे परंतु तरीही भाविक दर्शनासाठी आणि वनभोजनासाठी तिथे गर्दी करू लागले आहेत. 

हे ही वाचा... अपक्ष उमेदवार संजय शिंदेंचा महाविकास आघाडीला पाठिंबा

श्री विष्णू पदाविषयी दोन आख्यायिका प्रचलित आहेत. भक्त पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी आणि द्वारके हुन रुसून आलेल्या श्री रुक्‍मिणीला शोधण्यासाठी भगवान श्रीकृष्ण येथे आले होते. दुसरे म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी नंतर विठुराया आळंदीहून परत आला आणि परमभक्ताचा वियोग सहन न झाल्याने मार्गशीर्ष महिना भर विष्णुपदावरच मुक्कामी राहिला अशी वारकऱ्यांची भावना आहे. 

हे ही वाचा... साई मंदिराचा जागतिक विक्रम

विष्णू पदावर भगवान श्रीकृष्णाची दोन प्रकारची पावले असल्याचे सांगितले जाते. एक समचरण आणि दुसरे देहुडाचरण. याशिवाय चारही कोपऱ्यात गाईंच्या खुरांची चिन्हे असल्याचे दाखवले जाते. दोन खांबांवर भगवान श्रीकृष्णाच्या कोरीव मूर्ती आहेत. एका खांबावर श्री विष्णूची मूर्ती असून त्यांच्या हातात शंख चक्र गदा आणि कमळ पुष्प आहे. 

हे ही वाचा... अन मगरीने मारली पाण्यात उडी

चंद्रभागा नदी पात्रात श्री पुंडलिक मंदिरापासून दक्षिणेस सुमारे दीड किलोमीटर अंतरावर श्री विष्णुपद मंदिर आहे. मंदिर 30 फूट लांब 30 फूट रुंद असून उंची सुमारे बारा फूट आहे. सर्व बाजूंना पायऱ्या आहेत. मध्यभागी भगवान श्रीकृष्ण, गोपी, गाई यांच्या पाउल खुणांचे खडक आहेत . 16 दगडी खांब असून चौदा कमानी आहेत. श्री विष्णूपद मंदिराजवळ नदीपात्रात श्री नारदाचे वैशिष्ट्यपूर्ण हेमाडपंथी पद्धतीचे मंदिर असून त्यामध्ये नारदाची कोरीव मूर्ती आहे. 

मार्गशीर्ष महिन्यात भाविकांची विष्णू पदावर होणारी गर्दी लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी संपूर्ण परिसरातील स्वच्छता करून घेतली असून आवश्‍यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. 

पिंडदानासाठी महत्त्वाचे ठिकाण 
हिंदू धर्मात आपल्या पितरांना मुक्ती द्यायची असल्यास तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन पिंडदान विधी करावा लागतो. त्यातही जिथे भगवान श्रीकृष्णाची पावली उमटलेली आहेत तिथे पिंडदान विधी केल्यास पितरांची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते अशी समजूत आहे. त्यानुसार पंढरपूर जवळील या श्री विष्णुपद मंदिरात पिंटू दानासाठी विविध भागातून लोक येत असतात. काशी, गया, प्रयाग आदी धार्मिक स्थळांच्या प्रमाणे विष्णुपद येथे पिंडदान विधी वर्षभर सुरू असतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half feet water on Vishnupada in Pandharpur