मराठा क्रांती मोर्चाचे आमदारांच्या घरासमोर हलगी बजाव आंदोलन...आरक्षणास पाठिंब्याची आमदारांनी दिली पत्रे

बलराज पवार
Tuesday, 22 September 2020

सांगली-  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर आणि आमदार सुरेश खाडे यांच्या घरासमोर हलगी बजाव आंदोलन केले. दोन्ही आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारी आणि आरक्षण मिळवण्यासाठी राज्याची बाजू ठामपणे सर्वौच्च न्यायालयात मांडण्यासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधानांना पत्रे दिली. 

सांगली-  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर आणि आमदार सुरेश खाडे यांच्या घरासमोर हलगी बजाव आंदोलन केले. दोन्ही आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारी आणि आरक्षण मिळवण्यासाठी राज्याची बाजू ठामपणे सर्वौच्च न्यायालयात मांडण्यासाठी मुख्यमंत्री, पंतप्रधानांना पत्रे दिली. 

मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिले आहे. मात्र त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती देत यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी हा खटला घटनापीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे सन 2020-21 या वर्षात होणारे शैक्षणिक प्रवेश तसेच शासकीय नोकर भरती यामध्ये मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार आहे. आरक्षणाचा फैसला होईपर्यंत नोकर भरती करु नये, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या घटना पीठासमोर राज्याची बाजू भक्कम मांडावी आणि मराठा समाजास आरक्षण मिळवून द्यावे यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारवर सर्व लोकप्रतिनिधींनी दबाव टाकावा. यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे आजपासून लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हलगी बजाव आंदोलन सुरु करण्यात आले. 

क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय पाटील व विलास देसाई यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आज सकाळी भगव्या टोप्या, भगवे झेंडे घेऊन आमदार सुरेश खाडे यांच्या घरासमोर तसेच आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर जाऊन हलगी बजाव आंदोलन केले. यावेळी दोन्ही आमदारांनी मोर्चाचे समन्वयक विलास देसाई, डॉ. संजय पाटील, महेश खराडे यांच्याकडे पाठिंब्याची पत्रे सोपवली. 
या आंदोलनात राहुल पाटील, किरण भुजगडे, विजय धुमाळ, संतोष माने, योगेश पाटील, अंकित पाटील, विश्‍वजित पाटील, राहुल जाधव, अशोक पाटील, नितीन चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Halgi Bajav Andolan in front of MLA's house of Maratha Kranti Morcha