पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मार्गावर पांढरेपाणीत शिवभक्तांसाठी हॉल 

पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मार्गावर पांढरेपाणीत शिवभक्तांसाठी हॉल 

कोल्हापूर - पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मार्गावर असणाऱ्या शाहूवाडी तालुक्‍यातील पांढरेपाणी येथे शिवभक्तांसाठी 50 लाख रुपये खर्चून हॉल बांधण्यात येणार आहे. वीस गुंठे जागेतील हॉलमध्ये शिवभक्तांच्या राहण्याची सोय होणार आहे. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या खासदार फंडातून हे काम होत आहे. त्याची पायाभरणी येत्या महिन्यात होणार आहे. 

छत्रपती शिवराय सिद्धी जोहरच्या तावडीतून पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे निसटले होते. पावनखिंड परिसरात सिद्धी जोहरच्या सैन्याशी रणसंग्राम झाला होता. त्यात शेकडो मावळे धारातीर्थी पडले होते. पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेतून इतिहासाच्या या स्मृतींना अभिवादन केले जाते.

कोल्हापुरातील सह्याद्री प्रतिष्ठान, हिल रायडर्स, न्यू हायकर्स, कोल्हापूर हायकर्स, शिवशक्ती प्रतिष्ठान, मैत्रेय प्रतिष्ठान, मर्दानी कला विशारद आनंदराव पोवार मर्दानी आखाडा, इचलकरंजी गिरिभ्रमण संघटना, मुंबईतील भरारी पथकातर्फे दरवर्षी या मोहिमेचे आयोजन केले जाते. पदभ्रमंती मोहिमेत हजारो शिवभक्त सहभागी होतात. 

पन्हाळा, तुरुकवाडी, म्हाळुंगे, मसाई पठार, खोतवाडी, कुंभारवाडी, मांडलाईवाडी, करपेवाडी, आंबवडे, कळकेवाडी, माळवाडी, पाटेवाडी, सुकामाचा धनगरवाडा, पांढरेपाणी, भाततळी ते पावनखिंड परिसर असा मोहिमेचा 54 किलोमीटर मार्ग आहे. संस्था, संघटना आंबवडे व करपेवाडीमध्ये मुक्काम ठोकतात. शिवभक्तांना पांढरेपाणीत मुक्काम ठोकायचा झाल्यास मोठ्या हॉलची गरज होती. काही संस्थांनी संभाजीराजे व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्याकडे हॉलबाबत मागणी केली होती. संभाजीराजे यांनी हॉलसाठी खासदार फंडातून 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे. चौकेवाडी म्हणून इतिहास काळात प्रसिद्ध असणाऱ्या पांढरेपाणी या गावातच तो बांधला जाणार आहे. 

पावनखिंड परिसर पाहण्यासाठी राज्यभरातून इतिहास अभ्यासक, संशोधक, महाविद्यालयीन विद्यार्थी व पर्यटक येतात. त्यांना पांढरेपाणी येथे राहण्याची सोय नव्हती. ती हॉलच्या माध्यमातून मिळणार आहे. 
- हेमंत साळोखे,
अध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान. 

पदभ्रमंती मोहीम आयोजित करणाऱ्या संस्था, संघटनांसमोर पांढरेपाणी येथे शिवभक्तांची व्यवस्था कशी करावी, असा मोठा प्रश्न होता. त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. हॉलसाठी खासदार फंडातून तरतूद केल्याबद्दल संभाजीराजे यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. 
- प्रकाश मोरबाळे,
  अध्यक्ष, इचलकरंजी गिरीभ्रमण संघटना. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com