गणपती मंदिर, शंभर फुटी रोडवरील अतिक्रमणांवर हातोडा

बलराज पवार 
Wednesday, 7 October 2020

महापलिका क्षेत्रातील अतिक्रमण निर्मुलन मोहीम आज विश्रामबाग परिसरात राबवण्यात आली. हॉटेल चिनार, गणपती मंदिर तसेच शंभर फुटी रोडवरील काही अतिक्रमणांवर आज हातोडा घालण्यात आला.

सांगली : महापलिका क्षेत्रातील अतिक्रमण निर्मुलन मोहीम आज विश्रामबाग परिसरात राबवण्यात आली. हॉटेल चिनार, गणपती मंदिर तसेच शंभर फुटी रोडवरील काही अतिक्रमणांवर आज हातोडा घालण्यात आला. मोठ्या संख्येने रस्त्यावरील फलक, शेड, खोकी हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. 

महापालिकेच्या वतीने सांगलीत सर्व रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी बेकायदा उभारलेले डिजिटल फलक, शेड तसेच खोकी हटवण्याची मोहीम सुरु आहे. अतिक्रमण निर्मुलन विभागाने उपायुक्त राहूल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांवरील बाजारपेठेत कारवाई करुन रस्ते मोकळे केले आहेत. आज विश्रामबाग परिसरातील हॉटेल चिनारपासून गणपती मंदिर ते शंभर फुटी रोडपर्यंतची अतिक्रमणे हटवण्यात आली. 

गेल्या काही वर्षात बाजारपेठेतील रस्त्यावर व्यापारी, विक्रेत्यांनी शेड घालणे, कट्‌टे करणे, डिजिटल फलक उभारणे असे प्रकार केले आहेत. त्यामुळे ही जागा अडकून पडल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. यामुळे महापालिकेने अशी बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम उघडली आहे. या कारवाईत सहायक आयुक्त एस एस खरात, सहदेव कावडे, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक पंकज, श्रीकांत मद्रासी, अंजली कुदळे कोमल कुदळे, यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. 

रस्त्यावर शोभिवंत झाडांचे गार्डन नको 
सार्वजनिक रस्त्यावर शोभिवंत झाडांचे गार्डन करून रस्त्यावर अतिक्रमण केल्याचे या मोहीमे दरम्यान समोर आले. रस्त्यावर उभारलेल्या शोभिवंत झाडांमुळे रस्त्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे ज्यांनी रस्त्यावर शोभिवंत झाडे लावून गार्डन बनवून रस्ते अडविले आहेत. त्यांनी तातडीने काढून घ्यावीत अन्यथा महापालिका प्रशासनाकडून ते हटविण्यात येईल असा इशारा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला आहे.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hammer on encroachments on hundred feet road