दिव्यांग अंकुरची "कळसूबाई'ला गवसणी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

सांगली -  सह्याद्री खोऱ्यातील पावसाळ्याचे "नंदनवन' असलेल्या भंडारदरा परिसरातील सह्याद्रीचे सर्वोच्च "कळसूबाई' शिखर जत तालुक्‍यातील वायफळच्या अपंग अंकुर यादवने पहिल्याच प्रयत्नात "सर' केले. 

सांगली -  सह्याद्री खोऱ्यातील पावसाळ्याचे "नंदनवन' असलेल्या भंडारदरा परिसरातील सह्याद्रीचे सर्वोच्च "कळसूबाई' शिखर जत तालुक्‍यातील वायफळच्या अपंग अंकुर यादवने पहिल्याच प्रयत्नात "सर' केले. 

अल्पदृष्टीचा दुर्गभ्रमंतीकार सागर बोडके याच्या साथीने त्याने हे साहस केले. वर्षभरात 21 वेळा कळसूबाई सर करण्याचे टार्गेट ठेवलेल्या सागरने अकरावी फेरी अंकुरसोबत केली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय भवनातील मत्स्य व्यवसाय विभागात अंकुर नोकरी करतो. एका पायाने तो अपंग आहे. यापूर्वी अनेक गड-किल्ल्यांवर त्याने भ्रमंती केली.

ट्रेकिंगचा त्याचा पहिलाच अनुभव होता. गुढीपाडव्यादिवशी सकाळी सहाला सागरच्या साथीने त्याने कळसूबाईवर चढाई सुरू केली. पायथ्याच्या बारी गावातून जहागीरदारवाडीच्या माची मंदिरात कळसूमातेचे दर्शन घेतले. पाठीवर सात-आठ किलोची सॅक होती. एकेक टप्पा पार करीत उंच लोखंडी शिडी मार्गापर्यंत ते पोचले. "पर्यावरण रक्षण'ची पाटी छातीवर लावलेले अनेक जण भेटत गेले. तोल सावरत एक हजार 360 मीटर उंची गाठली. कणखर सह्याद्री चांगलीच कसोटी घेत होता; तरीही धैर्य राखून चढाई सुरू ठेवली. 

अजून 300 मीटरच्या चढाईसाठी "हर हर महादेव'ची ललकारी देत उंच व शेवटची शिडी पार केली. आणि कळसूबाई मंदिराचा ध्वज दिसला. सकाळी दहा वाजून 40 मिनिटांनी पूर्ण उंची गाठली. भगवा फडकवून फोटोसेशन केले. सह्याद्री निवासिनी कळसूमातेच्या दर्शनाची आस जिद्दीने पूर्ण झाली. दुपारी 12.20 ला परतीचा प्रवास सुरू झाला. वायफळ (ता. जत) येथील रहिवासी असलेल्या अंकुरला आता आणखी शिखरे खुणावताहेत. 

Web Title: handicap Ankur Yadav climb Kalsubai mountain