कलेच्या देवाण-घेवाणीतून उत्कर्षाकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सोलापूर - हातमाग विणकामाच्या नवनवीन तंत्रांचे प्रशिक्षण घेणाऱ्यांची साईबाबा चौक येथील श्रीनिवास अनंतुल यांच्या कार्यशाळेत लगबग सुरू आहे. यातील प्रत्येक प्रशिक्षणार्थी हातमाग विणकर असून, वॉलहॅंगिंग, रेशमी साड्या, बेडशीट तर कोणी टॉवेल उत्पादनातील तज्ज्ञ आहेत. मात्र, या कलांची देवाण-घेवाण करून, हातमागातून नवनवीन उत्पादने घेऊन उत्कर्ष साधण्याच्या उद्देशाने शासनाने सोलापूर विणकर समूह संस्थेच्या सभासदांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे.

सोलापुरात पूर्वापार हातमाग विणकाम चालत आले आहे. पूर्वीच्या खड्डा लूमपासून आताच्या फ्रेम लूमवर विविध उत्पादने घेतली जात आहेत. मात्र, पूर्वीच्या मानाने हातमागांची संख्या कमी होत आहे. ही कला जोपासून आजही येथील विखुरलेले विणकर पूर्वीपासून एकाच प्रकारचे उत्पादने घेत आहेत. या सर्वांना एका छताखाली आणून त्यांच्या उत्पादनांत नावीन्यता यावी, या उद्देशाने सोलापूर विणकर समूह संस्था (क्‍लस्टर) स्थापण्यात आली. यात १९१ विणकरांचा समावेश आहे.

क्‍लस्टरमार्फत या विणकरांना एकमेकांच्या कला आत्मसात करता याव्यात यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ब्लॉक लेव्हल क्‍लस्टरमार्फत दीड महिन्याचा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. क्‍लस्टरचे विभागीय अधिकारी परमेश्‍वर गदगे, मास्टर ट्रेनर म्हणून विणकर समूह संस्थेचे अध्यक्ष राजू काकी, सहायक प्रशिक्षक राजेशम सादूल, कार्यकारी व्यवस्थापक राघवेंद्र मुदगुंडी, डिझायनर सीमा माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात आहे.

हातमाग व्यवसायाच्या वृद्धीसाठी विणकर समूह संस्थेच्या सभासदांना आतापर्यंत डाइंग व डिझाईनचे प्रशिक्षण दिले आहे. पूर्वीपासून येथे पारंपरिक पद्धतीने ठराविक उत्पादनेच घेतली जातात. एकमेकांच्या कलेची देवाण-घेवाण व्हावी व यात नवीन पिढीही सहभागी व्हावी, यासाठी हे प्रशिक्षण सुरू केले आहे.
- परमेश्‍वर गदगे, विभागीय अधिकारी, हातमाग क्‍लस्टर

या हातमाग उत्पादनांचे प्रशिक्षण 
कॉटन साड्या, सिल्क साड्या, कोकणी साड्या, नारायणपेठी साड्या, नऊ वारी, दहा वारी व सहा वारी साड्या, ड्रेस मटेरिअल, वॉलहॅंगिंगची उत्पादने, बेडशीट व टॉवेल आदी.

प्रशिक्षण कालावधी व भत्ता
विणकर समूह संस्थेच्या १९१ सभासदांतून निवड झालेल्या ४० सभासदांना प्रशिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षणार्थीला २१० रुपये प्रतिदिन भत्ता मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात २० प्रशिक्षणार्थी सहभागी आहेत.

हातमाग उत्पादनांची वैशिष्ट्ये
पॉवरलूमच्या तुलनेत उत्पादने दर्जेदार, आकर्षक, मुलायम व टिकावू असतात. विजेविना व कुठल्याही मशिनरीविना उत्पादन होत असल्याने उत्पादनखर्च कमी होऊन ग्राहकाला स्वस्तात उपलब्ध होतात.  

Web Title: Handloom day special story