‘मायक्रोफायनान्स’च्या विरोधात गळफास आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

सांगली - नोटाबंदीने चलनटंचाई निर्माण झाली असताना खासगी मायक्रोफायनान्स कंपन्या चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुली करत आहेत. याविरोधात आज महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सहा महिलांनी प्रतीकात्मक गळफास आंदोलन केले. 

सांगली - नोटाबंदीने चलनटंचाई निर्माण झाली असताना खासगी मायक्रोफायनान्स कंपन्या चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुली करत आहेत. याविरोधात आज महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सहा महिलांनी प्रतीकात्मक गळफास आंदोलन केले. 

सुरेखा शेख, मंजुळा कदम, गोविंद खटावकर, शाहीन शेख, आसमा मुजावर आदींच्या नेतृत्वाखाली महिला आयोगाच्या वतीने आमराईपासून मोर्चा काढण्यात आला. आझाद चौक, स्टेशन चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेल्या कर्ज वसुलीने त्रासलेल्या महिलांचे प्रतीक म्हणून मोर्चाच्या अग्रभागी सहा महिलांच्या गळ्यात प्रतीकात्मक गळफास अडकवला होता.

या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. खासगी मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून खासगी वित्त कंपन्यांकडून चुकीच्या पद्धतीने वसुली सुरू आहे. कायद्यानुसार मान्यता घेताना लिहून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. मनमानी पद्धतीने व्याजदराची आकारणी करणाऱ्या वित्त कंपन्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हावेत. संबंधित कंपन्यांच्या बेकायदा आर्थिक व्यवहाराची सीबीआय, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी, कायद्यानुसार व्याजदराची अधिकृत सही शिक्‍क्‍यासह माहिती दिल्याशिवाय हप्ते भरणार नाही, अशी भूमिका कर्जदार महिलांची असून त्यांना संरक्षण द्यावे, आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे. कर्ज वसुलीच्या मनमानी पद्धतीचा मोर्चाद्वारे निषेध करण्यात येत आहे. याची दखल न घेतल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: hanging in the movement against microfinance