बजरंगबली की जय!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

सांगली - बजरंगबली अर्थात हनुमान यांचा जयजयकार आज साऱ्या सांगलीभर होता. शहर आणि परिसरात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजनही ठिकठिकाणी करण्यात आले होते. दरम्यान, तुंग येथील जागृत असणाऱ्या मारुतीच्या दर्शनासाठी महराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून हजारो भाविकांची उपस्थिती होती.  

सांगली - बजरंगबली अर्थात हनुमान यांचा जयजयकार आज साऱ्या सांगलीभर होता. शहर आणि परिसरात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजनही ठिकठिकाणी करण्यात आले होते. दरम्यान, तुंग येथील जागृत असणाऱ्या मारुतीच्या दर्शनासाठी महराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून हजारो भाविकांची उपस्थिती होती.  

सांगलीतील मारुती चौकातील मंदिरात पहाटेपासून भक्तांची रीघ लागली होती. मारुतीरायाला नतमस्तक होऊन वंदन केले जात होते. दुपारी जन्मकाळ साजरा करण्यात आला. तसेच कीर्तन, भजनाचा कार्यक्रमही झाला. सायंकाळपर्यंत भक्तांची रीघ होती. तसेच पंचमुखी मारुती मंदिरात गेल्या चार दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे महापूजा झाली. त्यानंतर जन्मकाळ झाला. कीर्तन, भजनाचे कार्यक्रम झाल्याने सारे वातावरण भक्तिमय होते. सांगलीत एकच पंचमुखी मारुती मंदिर असल्याने भक्तांची गर्दी होती. तसेच विश्रामबाग येथील जयहिंद कॉलनीतील मारुती मंदिरातही भक्तांची गर्दी होती. सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गव्हर्न्मेंट कॉलनीतील मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रम झाले. काँग्रेसभवन चौकातील मधुबन रिक्षा मंडळातर्फे दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. समर्थ चौकातील श्री समर्थ हनुमान सेवा मंडळातर्फे कीर्तन भजन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर पट्टणशेट्टी, उपाध्यक्ष दौलत कोकाटे यांनी संयोजन केले. 

* कारागृहातही उत्साह 
जिल्हा कारागृहात हनुमान जयंती पारंपरिक पद्धतीने साजरी झाली. कारागृहात जुने हनुमान मंदिर आहे. प्रतिवर्षी हनुमान जयंती उत्साहात साजरी केली जाते. यंदाही हनुमान जयंतीनिमित्त काही कैद्यांनी रंगरंगोटी करून मंदिर परिसर सुशोभित केला. आज सकाळी हनुमान जन्मकाळाचा पाळणा झाला. त्यानंतर दुपारी कर्मचाऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले गेले. कारागृह अधीक्षक सुशील कुंभार, तुरुंगाधिकारी एस. आर. एकशिंगे आदींसह अधिकारी व कर्मचारी यांनी हनुमान जयंती उत्सवाचे नेटके संयोजन केले. 

* उमेद ग्रुपतर्फे महाप्रसाद 
कुपवाड औद्योगिक वसाहतीतील उमेद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजतर्फे हनुमान जंयती साजरी करण्यात आली. परिसरातील चार हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, राष्ट्रवादीचे संजय बजाज उपस्थित होते. उमदे ग्रुपचे संचालक नेमिचंद मालू, सतीश मालू, नितीन मालू, गणेश मालू, अक्षय मालू, रवींद्र मालू, सुभाष मालू यांनी संयोजन केले.  

Web Title: Hanuman jayanti celebration