वनक्षेत्रातील केबल तत्काळ काढा - धुमाळ

सुनील पाटील
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

कोल्हापूर - वनक्षेत्रातून बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने टाकलेली केबल तत्काळ काढावी, असे आदेश जिल्हा उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांनी ज्या-त्या वनपाल आणि वनक्षेत्रपालांना आज दिले. जिल्ह्यात केबलसारखे अतिक्रमण असेल तर ते तत्काळ काढण्याची सूचना दिली आहे.

कोल्हापूर - वनक्षेत्रातून बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने टाकलेली केबल तत्काळ काढावी, असे आदेश जिल्हा उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांनी ज्या-त्या वनपाल आणि वनक्षेत्रपालांना आज दिले. जिल्ह्यात केबलसारखे अतिक्रमण असेल तर ते तत्काळ काढण्याची सूचना दिली आहे.  

तत्कालीन जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्‍ला यांनी एका खासगी कंपनीला वनक्षेत्रातून केबल टाकण्याची परवानगी दिली होती. या परवानगीनुसार संबंधित कंपनीने वडरगे (ता. आजरा) व माद्याळ (ता. कागल) दरम्यान दीड किलोमीटरपेक्षा जास्त वनक्षेत्रातील खोदाई करून केबल टाकली. वनक्षेत्रातील खोदाई चुकीची असल्याचे लक्षात येताच शुक्‍ला यांनी स्वत:च केबल टाकण्याची परवानगी रद्द करण्याचे आदेश दिले होते. आज ‘सकाळ’मधून अधिकाऱ्यांच्या या भोंगळ कारभाराचा भांडाफोड झाल्यानंतर श्री. धुमाळ यांनी तत्काळ यावर कारवाईचे आदेश दिले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी याच कंपनीने केबल टाकली आहे. त्यामुळे सध्या वडरगे आणि माद्याळ येथे दीड किलोमीटर केबल दिसत असली तरीही इतर ठिकाणीही याची चौकशी करावी लागेल. ही केबल टाकत असताना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. वन विभागाच्या एका अध्यादेशाचा चुकीचा अर्थ लावून केबल टाकण्यात आली. यात उपवनसंरक्षकानंतरच्या एका अधिकाऱ्याने उत्साहाने पुढाकार घेतला होता.

श्री. धुमाळ यांनी चुकीच्या कामावर कारवाई केली; पण ज्यांनी ही बेकायदेशीर केबल टाकली, त्या अधिकाऱ्यांवर मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. आता उपवनसंरक्षकांनीच चूक केली असेल तर वन विभागाकडून कोणती कारवाई केली जाणार, हे पाहावे लागेल. 

Web Title: Hanumant Dhumal comment