नरेंद्र आणि देवेंद्र सरकार उलथवून टाका - हार्दिक पटेल

नरेंद्र आणि देवेंद्र सरकार उलथवून टाका - हार्दिक पटेल

ढालगाव - येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश न झाल्यास नरेंद्र आणि देवेंद्र सरकार उलथवून टाका, असे आवाहन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केले.

तसेच लोकसंख्येच्या आधारे प्रत्येक समाजाला आरक्षण द्या, अशी मागणीही हार्दिक पटेल यांनी केली. आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात तिसऱ्या दसरा मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मेळाव्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. 

गुजरातमधील पटेल समाजाच्या आरक्षणाच्या निमित्ताने देशव्यापी प्रसिद्धी मिळवलेल्या श्री. पटेल यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्ला करताना  भाजपला नुकतीच सोडचिठ्ठी दिलेले गोपीचंद पडळकर यांनी हा मेळावा आयोजित केला होता. 

ते म्हणाले, ‘‘आरक्षण त्या त्या समाजाची टक्केवारी निश्‍चित करून त्याआधारे मिळावे. देशभरात हरियाणा, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र अशा विविध राज्यांत विविध समाजाची आरक्षणासाठीची आंदोलने सुरू आहेत. भविष्यातील पिढी शैक्षणिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या सक्षम व्हायची असेल तर आरक्षण हेच एकमेव हत्यार आहे. त्याचा वापर कराल तर वाघासारखे जगाल; अन्यथा आपली अवस्था मांजरासारखी होईल.’’

‘असले उद्योग बंद करा’
माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यावर टीकेची झोड उठवताना श्री. जानकर म्हणाले, ‘‘समाजातील कोणत्याही लोकप्रतिनिधीविषयी आम्ही बोलत नव्हतो; पण या मेळाव्याआधी समाजातीलच काही फितुरांनी गोपीचंदवर अनेक गुन्हे दाखल करून मोका लावण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे हट्ट धरला. आता असले धंदे बंद करा. तुमच्या मेळाव्याला किती लोक आहेत, यातूनच तुमची ताकद लक्षात आली आहे.’’

ते म्हणाले, ‘‘सत्ताधाऱ्यांची आरक्षण देण्याची मानसिकता नाही. अशी सरकारे हवीत कशाला? त्यांना सत्तेवरून खेचा. मी भाजपवर विश्वास ठेवला म्हणूनच फसलो. मी केलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी सत्ताधारी सरकारने माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केले. मी त्याला कधीच भीक घातली नाही. आपणही आरक्षणाचा लढा तीव्र करा. सर्वच पक्षांनी आरक्षणाबाबत धोका दिला आहे. असाच मेळावा तुम्ही मुंबईत यशस्वी केलात तर सत्ताधारी तुम्हाला तत्काळ आरक्षण देतील. त्यासाठी गोपीचंदसारख्या लढाऊ नेत्याच्या पाठीशी समाजाने बळ उभे करा.’’ 

श्री. पडळकर म्हणाले,‘‘लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी आरक्षण न मिळाल्यास जमलेल्या दीड लाख समाजबांधवांनी बिरोबाच्या साक्षीने इथे शपथ घ्यावी की भाजपच्या कोणत्याच उमेदवाराला मतदान करणार नाही. पडळकर किंवा जानकर खासदार-आमदार होऊन  समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी आरक्षणच हवे. राज्यात ९१ भाजप आमदारांचे भवितव्य तेथील धनगर समाज ठरवू शकतो. त्यांनी आमच्या मतांवर गुलाल उधळला. चार वर्षे आरक्षणासाठी झुलवत ठेवले. टाटा सोशल सायन्सेसला आमचे आरक्षण नाकारण्याचा अधिकार कोणी दिला? धनगर समाजाला दहा लाख विनातारण कर्ज, शंभर मुलांचे प्रत्येक जिल्ह्याला  वसतिगृह दिले पाहिजे. धनगर आरक्षणाचा निर्णय  होईपर्यंत नोकरभरती थांबली पाहिजे.’’
उत्तम जानकर म्हणाले,‘‘शिवसेनेच्या कार्याध्यक्षांची आम्ही मातोश्रीवर भेट घेतली. त्यांनी तीस दिवसांत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास दसरा मेळाव्यात सरकारच्या भवितव्याचा फैसला करू, असा शब्द दिला आहे.’’

क्षणचित्रे
० हार्दिक पटेल यांच्या उपस्थित महिलांसमवेत आरक्षणाची महाआरती
० मेळाव्यासाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी मैदान अपुरे पडले 
० लोकांनी घरावर व ट्राफिकमध्ये अडकलेल्या लोकांनी एसटीबसवर बसून मेळावा अनुभवला
० ढालगाव, नागज दोन्ही बाजूचे रस्ते वाहतुकीच्या कोंडीमुळे जाम
० मेळाव्याला महिलांची संख्याही लक्षणीय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com