दोनशे वर्षेही बासरी वाजवेन ! - हरिप्रसाद चौरासिया

दोनशे वर्षेही बासरी वाजवेन ! - हरिप्रसाद चौरासिया

सांगली -ऐंशी वर्षेच का; मी दोनशे वर्षे बासरी का नाही वाजवू शकत. नक्की वाजवेन. अशा शब्दात नाट्यपंढरी सांगलीतील हृद्य सत्कारानंतर पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नेहमी बासरीच्या सुरांनी रसिकांची हृदये जिंकणाऱ्या पंडितजीनी आपल्या नम्र प्रेमळ शब्दातून संवाद साधत सांगलीकरांची मने जिंकली.

‘गुरुकुल’ संस्थेने पंडितजींच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त समस्त सांगलीकरांच्यावतीने सत्काराचा हा योग जुळवून  आणला. बॅडमिंटनमध्ये सांगलीची पताका फडकवणारे खेळाडू नंदू नाटेकर आणि चिन्मय मिशनच्या माध्यमातून आध्यात्माचा प्रसार करणारे स्वामी तेजोमयानंदजी यांच्या हस्ते झालेला सत्कार म्हणजे सूर, क्रीडा आणि अध्यात्माचा संगमच ठरला. सांगलीच्या सांस्कृतिक इतिहासासाठी हा समारंभ म्हणजे मर्मबंधातील ठेवच.

बासरी..भगवान श्रीकृष्णाची. त्याची ती बासरी  भूतलावरील कोणीही ऐकली नाही. मात्र ती कशी वाजत असेल याचा प्रत्यय मात्र पंडितजींच्या सुरांनी येतो अशी स्तुतिसुमने सातारच्या अरुण गोडबोले यांनी उधळली आणि सत्कार समारंभाची उंची वाढत गेली. सातारच्या कंदी पेढ्याची माळ पंडितजीना अर्पण करणाऱ्या गोडबोलेंनी सातारचा कंदी पेढा म्हणजे शुद्धता, स्वस्थता आणि मधुरतेचा संगम आहे.

पंडितजींच्या बासरीच्या सुरांमध्ये या तीनही गोष्टींचा समन्वय आहे. किंबहुना त्यापेक्षा जास्त या तीनही गुणांचा मिलाफ आहे, असे ते म्हणाले. पंडितजींपेक्षा चार वर्षांनी ज्येष्ठ असणारे नंदू नाटकेर यांनी आजचा सत्काराची संधी म्हणजे आयुष्यातील सर्वोच्च संधी असल्याची कृतज्ञता व्यक्त केली. 

ते म्हणाले,‘‘मला ही संधी गुरुकुलच्या संस्थापक विदुषी मंजुषा पाटील-कुलकर्णी यांनी का दिली याचा विचार करता कदाचित मी या वयात थोडंफार गाणं शिकत असल्यामुळे असावी. या अनुभवातून सांगतो. की खेळांपेक्षा गाणं खूप कठीण. कधी काळी मी मैदानावर खेळत होतो मात्र आता नाही. पंडितजी मात्र आजही ऐंशीव्या वर्षी त्याच ताकदीने बासरीचे सूर लावतात. हे परमेश्‍वरी देणंच.’’ 

हरिप्रसाद म्हणजे ‘भगवान हरीने हम सबके लिये दिया हुआ प्रसाद’ अशा शब्दात पंडितजींच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदानाचा गौरव स्वामी तेजोमयानंदजी यांनी केला. ते म्हणाले,‘‘सर्व गुणांचा एका व्यक्तीमध्ये संयोग होतो तेव्हा त्याला गीतेत विभूतियोग म्हटलेय. हरिप्रसादजींचे व्यक्तिमत्त्व म्हणजे विभूतियोग आहे.’’

नाटेकरांच्या या ऐंशीव्या वर्षाचा संदर्भ घेत पंडितजींनी रसिकांचीच फिरकी घेतली. ते म्हणाले,‘‘ऐंशीच का मी दोनशे वर्षे बासरी का वाजवू शकत नाही. श्रीकृष्णाच्या काळात गोपी यायच्या. आता त्या येत नाहीत. मात्र  आल्या तर पोलिस स्टेशनला जायला लागेल.

गुरुकुल संस्थेसाठी मी यापूर्वी सांगलीत आलो होतो. मंजुषा  आणि तिची मुले असे काही गात होती की मन भरून आले. ही संस्था मोठी होईलच. मी तेव्हाही इथे येईन. गोविंद बेडेकरांमुळे सत्काराचा योग आला. संगीत  क्षेत्राला अशा अनेक बेडेकरांची गरज आहे.  सांगलीकरांनी प्रेमाने केलेला हा गौरव आयुष्यभर  स्मरणात राहील. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’’

खासदार पाटील म्हणाले,‘‘गुरुकुलच्या रूपाने मंजुषा पाटील यांनी सांगलीची परंपरा पुढे नेली. त्यांच्या संस्थेस सर्वकाही मदत केली जाईल.’’

मंजूषा पाटील-कुलकर्णी यांनी आभार मानले. आमदार सुधीर गाडगीळ, पद्मश्री विजय घाटे, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, उद्योजक नानासाहेब चितळे आदी उपस्थित होते. पंडित हृषीकेश बोडस, ज्येष्ठ गायिका मंगला जोशी यांचा संस्थेच्यावतीने पंडित चौरासिया यांच्या हस्ते सत्कार झाला. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीस तसेच समारंभास सांगलीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com