आता भात कापायचे ते जनावरांच्या सुग्रास साठी

सुनील कोंडुसकर
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

पावसात भिजलेले हे भात खाण्यासाठी उपयुक्त नसल्याचे त्यांनी सांगितले हे पीक कापले नाहीतर भात झडून पुढच्या पिकाला मार देणार, त्यापेक्षा ते कापायचे आणि वाळवून जनावरांना सुग्रास म्हणून वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चंदगड - अवघ्या शिवारभर पावसाच्या माऱ्याने कोलमडून पडलेले भात, गुडघाभर चिखल तर काही ठिकाणी भात पिकावरुन वाहणारे पाणी. चिखलात झडून पडलेल्या भाताला कोंब फुटलेले. आता हे भात माणसाने खायच्या दर्जाचे राहिले नाही. याचा उपयोग जनावरांना सुग्रास म्हणूनच. अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या चेहर्‍यावरील भाव काळीज चिरणारे. हंबेरे ( ता. चंदगड) परिसरातील शेतकऱ्यांच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया. संपूर्ण तालुक्यात असेच चित्र पाहायला मिळते.

नाना पाटील यांचे गावाला लागूनच शिवारात दीड एकरामध्ये सोनम जातीचे भात आहे. पुरातून वाचलेले भात चांगले तरारले होते. परंतु अवकाळी च्या दणक्याने ते पूर्णतः कोलमडले आहे. त्यांच्या मालकीचा पट्टा जमिनीलगत आडवा झाला आहे. दररोजच्या पावसाने झडलेले भात चिखलात उगवले आहे.

पावसात भिजलेले हे भात खाण्यासाठी उपयुक्त नसल्याचे त्यांनी सांगितले हे पीक कापले नाहीतर भात झडून पुढच्या पिकाला मार देणार, त्यापेक्षा ते कापायचे आणि वाळवून जनावरांना सुग्रास म्हणून वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे 15 हजार रुपयांचा खर्च वाया गेलाच परंतु यावर्षी खायचे काय असा प्रश्नही त्यांनी केला. बळीराम पाटील यांनीही दीड एकरामध्ये सेंद्रिय पद्धतीने 'चिंटू' जातीचे पीक घेतले होते. 60 पोती उत्पादन होईल अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु अवकाळीने त्यावर पाणी फिरवले आहे. कृष्णा पाटील, तुकाराम गडकरी यांचीही अशीच अवस्था आहे.

पाऊस दररोज कोसळत आहे. सद्यस्थितीत थांबला तरी शेतातील पाणी आटण्यास किमान पंधरा दिवसाचा कालावधी लागेल. एवढ्या वेळात हा हंगामध्ये हातचा निघून जाणार असल्याची भीती सुभाष पाटील यांनी व्यक्त केली. कृषी विभागाचे अधिकारी बांधावर उभा राहून पंचनामे करतात. त्यांनी शेतात उतरून पिकाला हात लावून पाहणी केली तर अवस्था कळेल असा रागही आळवला. दरम्यान शिवारात भात व ऊस पिकाचे प्रमाण मोठे असून संपूर्ण शिवार पाण्याने तुडुंब भरला आहे. शेतात पाण्याच्या उगळी फुटल्या आहेत. सतत पाण्यामुळे जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

"महापुरामुळे नदीकाठची भातशेती वाया गेली. आता अवकाळीने उरलेल्या पिकांची नासाडी केली आहे. जनावरांच्या वैरणीचा प्रश्नही गंभीर झाला आहे. या विभागातील शेतकरी पिक विमा घेत नाहीत त्यामुळे शासनाने भरघोस मदतीचा हातभार लावण्याची गरज आहे."

 - बाळकृष्ण पाटील, शेतकरी, हंबेरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harvesting Of Paddy For Cattle Fodder