धडधड...पहिल्याच इंग्रजी पेपरची

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

जिल्ह्यात ४२ केंद्रांवर बारावीच्या परीक्षेला सुरवात; सात भरारी पथके

जिल्ह्यात ४२ केंद्रांवर बारावीच्या परीक्षेला सुरवात; सात भरारी पथके

सांगली - आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्यावरील बारावीच्या परीक्षांना आज सुरवात झाली. इंग्रजीच्या पहिल्या पेपरला केंद्रावर पोचण्यासाठी सकाळी नऊ वाजण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची लगबग अन्‌ पालकांची काळजी... अशा ‘परीक्षामय’ वातावरण होते.  जिल्ह्यातील ४२ केंद्रांवर ३७ हजार ५०३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सात भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. काही ठिकाणी बैठक व्यवस्था शोधण्यातला गोंधळ वगळता सर्वत्र पहिला पेपर सुरळीत पार पडला.   

परीक्षा केंद्रावर सकाळी साडेनऊपासून विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली होती. बहुतांश केंद्रांवर सकाळी दहा ते सव्वा दहाच्या सुमारात विद्यार्थांनी परीक्षेचे रिसिट पाहून आत सोडण्यात आले. केंद्रावर बैठक व्यवस्था पाहण्यासाठी लगबग सुरू होती. केंद्रावरील फळ्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा संदेश लिहिला होता; तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक सूचना फलकही लावले होते. विद्यार्थ्यांनी कॉपी अथवा गैरप्रकार केल्यास काय शिक्षा आहे, याचे ‘बोर्डा’कडून आलेले माहितीपत्रकही परीक्षा केंद्राच्या आवारात लावले होते. तत्पूर्वी विद्यार्थी आपापल्या मित्र-मैत्रिणीबरोबर हस्तांदोलन करून केलेल्या अभ्यासाची चौकशी करीत होते. परीक्षा केंद्रावर येण्यासाठी शहरातील विद्यार्थी उशिरा निघाले. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र सकाळी साडेआठ ते नऊ वाजताच घर सोडावे लागले. लवकर आल्याने परीक्षा केंद्राबाहेर उभे राहून विद्यार्थिनी अभ्यास करीत होत्या. पहिला पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन नव्हते. त्यामुळे अनेकांच्या चर्चा व गप्पा सुरू होत्या. काही विद्यार्थ्यांना आलेल्या केंद्रावर आपला आसन क्रमांक न सापडल्याने 
जवळच्याच दुसऱ्या केंद्रावर जावे लागल्याने काहीशी धावपळ झाली. परीक्षेला वर्गात जाताना नेहमी आपल्या बॅगा वर्गाबाहेर ठेवल्या होत्या.

Web Title: has exam start