मुश्रीफ यांनी शरद पवारांसोबत असल्याचे कृतितून केले स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते श्री. मुश्रीफ काय करणार याविषयी उत्सुकता होती. तथापि मुंबईतील घडामोडीनंतर सर्व प्रथम श्री.पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी जाऊन श्री. मुश्रीफ यांनी त्यांची भेट घेतली,

कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले, त्याला नकार दिल्यानंतर थेट प्राप्तीकर विभागाची धाडही घरावर पडली तरीही "शरद पवार एके शरद पवार' हेच आपले अंतिम ब्रीदवाक्‍य होते असे सांगणारे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांनी आजही आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे कृतीतून सिध्द करून दाखवले. श्री. मुश्रीफ हे काहीही झाले तरी पवार यांची साथ सोडणार नाही असा विश्‍वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. श्री. मुश्रीफ यांनीही आपण श्री. पवार यांच्यासोबतच राहू असे सांगितले आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात श्री. पवार यांच्याशी एकनिष्ठ अशी श्री. मुश्रीफ यांची ओळख आहे. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीत असतानाच श्री. मुश्रीफ यांच्याशी त्यांचा वाद झाला. या वादाने टोक गाठले पण त्या सर्व वादात श्री. पवार यांनी मात्र श्री.मुश्रीफ यांनाच बळ दिले. लोकसभा निवडणुकीच्या कागल येथे झालेल्या प्रचारसभेत मी जो आज काही आहे तो केवळ श्री. पवार यांच्यामुळेच असे सांगतानाच श्री.मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले होते. पण आज अचानक राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आणि राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनीच भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या भुकंपानंतर जिल्ह्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली.

या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते श्री. मुश्रीफ काय करणार याविषयी उत्सुकता होती. तथापि मुंबईतील घडामोडीनंतर सर्व प्रथम श्री.पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी जाऊन श्री. मुश्रीफ यांनी त्यांची भेट घेतली, त्यानंतर श्री. मुश्रीफ हे श्री. पवार यांच्यासोबत होते, त्यामुळे ते राष्ट्रवादीसोबतच राहतील हे स्पष्ट झाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hasan Mushrif With Sharad Pawar