...तर व्ही. बीं.कडे पक्षाची धुरा देऊ - हसन मुश्रीफ

...तर व्ही. बीं.कडे पक्षाची धुरा देऊ - हसन मुश्रीफ

कोल्हापूर - राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर हुकूमशाहीचा आरोप करणारे माजी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांची इच्छा असेल, तर पक्षाची धुरा त्यांच्याकडे द्यायला आम्ही तयार आहोत, असे मत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी आज व्यक्त केले. या निवडणुकीच्या तोंडावर पक्षापासून दुरावलेल्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, त्यांचे पुत्र धैर्यशील माने यांच्यासह इतरांनी पक्षात यावे, असे भावनिक आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी या वेळी केले. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाच्या सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. ताराबाई पार्कातील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम झाला. 

ते म्हणाले, ‘‘ही निवडणूक वेगळ्या वळणावर झाली. एकीकडे सत्ता व संपत्ती, तर दुसरीकडे सामान्य कार्यकर्ते. अशा परिस्थितीत पक्षाच्या उमेदवारांनी मिळवलेला विजय निश्‍चित बळ देणारा आहे. काही तालुक्‍यांत पक्षाला भोपळाही फोडता आला नाही, ही गोष्ट चांगली नाही. ज्या तालुक्‍यात यश मिळाले नाही, त्याठिकाणी अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. त्याची जबाबदारी नेत्यांवर निश्‍चित केली जाईल. पन्हाळा-शाहूवाडीची जबाबदारी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकरांवर, करवीरची जबाबदारी ए. वाय. पाटील व माझ्यावर, शिरोळ यड्रावकरांकडे, तर गडहिंग्लजमध्ये कुपेकर यांच्यासह सर्वांनी लक्ष घालावे लागेल.’’

गैरसमजुतीतून माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, धैर्यशील माने यांनी वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षाचे हातकणंगले तालुक्‍यात फार मोठे नुकसान झाले. धैर्यशील यांच्या पत्नी पक्षाच्या चिन्हावर उभ्या असत्या तर त्या कदाचित निवडूनही आल्या असत्या. आता झाले गेले विसरून त्यांच्यासह पक्ष सोडलेल्यांनी पुन्हा परत यावे. त्यांचे स्वागतच केले जाईल, असे भावनिक आवाहनही श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केले.

के. पी. पाटील म्हणाले, ‘‘या निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर करून भाजपबरोबरच त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी जिल्ह्याचे वातावरण गढूळ केले. पैसे व आमिषे याचा परिणाम जिल्हाभर दिसला. गेल्या वेळी जिंकलेल्या जागाही पक्षाला मिळाल्या नाहीत. आम्हाला आव्हान देणाऱ्या अशोक चराटी यांचा पराभव झाला, त्याठिकाणी पक्षाच्या विजयासाठी मुकुंद देसाई यांनी चांगले प्रयत्न केले. आता जिल्ह्याच्या व्यापक हितासाठी कोणाशी युती करायचे याचे अधिकार आमदार हसन मुश्रीफ यांनाच राहतील. त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा.’’

शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी या निवडणुकीत विरोधकांकडून पक्षाचा वारेमाप खर्च झाल्याचा आरोप केला. पक्षाकडून यापुढे निधीचे पाठबळ देणार असाल तरच कार्यकर्ता लढायला तयार होईल, असेही ते म्हणाले. आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, ‘‘शंभर-दोनशे मतांनी पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवामागे पैसा हा मोठा ‘फॅक्‍टर’ ठरला. यापुढे सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ येईल, याचा पक्षाने विचार करावा.’’

अनिल साळोखे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा बॅंकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, गणपतराव फराकटे आदी उपस्थित होते. 

पक्षाची बदनामी करू नका
आमिषाला बळी पडून स्वतःसह पक्षाची बदनामी करू नका. राष्ट्रवादी हा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे. विकासाचा दृष्टिकोन असलेले नेते या पक्षात आहेत. कुठल्याही आमिषाला बळी पडून वेगळा निर्णय घेऊ नका, अशी विनंती श्री. मुश्रीफ यांनी नवनिर्वाचीत सदस्यांना केली. 

त्यांना अधिकार नाही
पक्षापासून गेली दहा वर्षे दुरान्वये संबंध नसलेल्यांनी पक्ष नेतृत्त्वावर टीका करू नये, त्यांना नेत्यांकडे तक्रार करण्याचा अधिकार कोणी दिला. त्यांनी पक्षासाठी काय केले? असा टोला ए. वाय. पाटील यांनी व्ही. बी. पाटील यांचे नाव न घेता लगावला. तोच संदर्भ घेऊन श्री. मुश्रीफ यांनी व्ही. बी. पाटील यांची इच्छा असेल तर पक्षाची धुरा त्यांना द्यायला आम्ही तयार असल्याचे सांगितले.

काँग्रेस नेते आमच्यासोबत नव्हते
राधानगरीच्या आमदारांनी प्रत्येक उमेदवाराला लाखो रुपये दिले, रस्त्यांची कामे जागेवर सुरू केली, त्याचा फटका बसला. आमदार सतेज पाटील हे श्री. मुश्रीफांसोबत होते; पण ते आमच्यासोबत नव्हते, असा टोलाही के. पी. पाटील यांनी लगावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com