शरद पवारांना पंतप्रधान करणारच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

‘‘पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांच्या नावावर एकमत होईल की नाही, याबाबत शंका आहे. एकमत फक्त शरद पवार यांच्या नावावरच होईल. लोकसभेत निवडून आलेल्या माणसालाच पंतप्रधानपद शोभादायी ठरेल.’’

कागल - शरद पवार यांच्या रूपाने राज्यातील मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. अशा वेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निदान अपशकुन तरी करू नये, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या शिवजयंती नियोजन मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रताप ऊर्फ भैया माने होते.

श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी पुण्यात बैठक घेतली होती. त्यामध्ये के. पी. पाटील, धनंजय महाडिक, जयंत पाटील, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते-पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील अशी आम्ही अनेक मंडळी उपस्थित होतो. त्यावेळी पवार यांच्यावर माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली पाहिजे असा दबाव आणला.

डी. वाय. पाटील राष्ट्रवादीत आले, त्याविषयी मी पवारसाहेबांना विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘डी. वाय. पाटील म्हणत होते की, माझी आत्मिक शक्ती प्रबळ आहे. या वेळेस पंतप्रधान शरद पवार होतील. पवार पंतप्रधान होणे आणि मी राष्ट्रवादीत नसणे हे बरोबर नाही, असे सांगत ते राष्ट्रवादीत आले.’’

मुश्रीफ म्हणाले, ‘‘पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांच्या नावावर एकमत होईल की नाही, याबाबत शंका आहे. एकमत फक्त शरद पवार यांच्या नावावरच होईल. लोकसभेत निवडून आलेल्या माणसालाच पंतप्रधानपद शोभादायी ठरेल.’’

यावेळी युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, माणिक माळी, प्रवीण भोसले, नवीद मुश्रीफ, रमेश माळी, प्रकाश गाडेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवजयंती थाटात करणार
आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘‘१९ फेब्रुवारीची शिवजयंती कागलमध्ये, दक्षिण भारतात सर्वांत मोठ्या प्रमाणात करूया. कार्यकर्त्यांनी मला कधीच फसविले नाही. ते माझ्या गळ्यातील ताईत आहेत. माताभगिनींनी माझा सांभाळ केला आहे. राष्ट्रवादीचे महिला मेळावे पाहून विरोधकांची हवा टाईट झाली आहे. विरोधकांपेक्षा सर्वच बाबतीत आपण सरस आहोत हे शिवजयंतीच्या निमित्ताने दाखवून देऊया. विरोधकांच्या पोटात गोळा उठेल अशी शिवजयंती साजरी करूया.’’

Web Title: Hashran Mushrif comment