पंढरपूर : दिवाळीतलं विठुमाऊलीचं हे रुप तुम्ही पाहिलंत का? (व्हिडिओ)

Vitthal-Rukmini
Vitthal-Rukmini

पंढरपूर : पंढरीचा सावळा विठ्ठल हा गोरगरीब शेतकरी अन् कष्टकऱ्यांचा देव म्हणून परिचित आहे; परंतु या विठुरायाला अनेक अमूल्य हिरे, माणिक, मोती, पाचू यांनी मढवलेले अत्यंत आकर्षक आणि प्राचीन अलंकार देखील आहेत. दिवाळीनिमित्त सध्या दररोज विठुरायाला हे अलंकार घातले जात असल्याने राजस सुकुमाराचे रूप आणखीनच खुलून दिसत आहे. देवाचे हे रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होत आहेत.

विठुरायाच्या खजिन्यात दीडशेहून अधिक प्रकारचे दागिने आहेत. शिंदे सरकार, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, बाजीराव पेशवे यांच्यासह अनेक भक्तांनी हे दागिने विठ्ठलाला अर्पण केले आहेत. श्री रुक्मिणी मातेच्या खजिन्यातही तब्बल 266 हून अधिक लहान-मोठे दागिने आहेत. सावळ्या विठुरायाचे आणि रखुमाईचे रूप हे अलंकार चढवल्यावर अधिकच खुलून दिसते आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणीला नवरात्रात विविध अलंकार आणि वैशिष्ट्यपूर्ण पोशाख केले जातात. याशिवाय संक्रांत, अक्षयतृतीया, गुढीपाडवा, नागपंचमी, राखीपौर्णिमा, माघ शुद्ध पंचमी, श्रावणातील चार शुक्रवार अशा काही ठराविक दिवशी अलंकार घातले जातात. राष्ट्रीय सण म्हणून 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त देखील अलंकार घातले जातात.

श्री विठ्ठलाला  मोत्याची बाजीराव कंठी, हिऱ्याची मोर मंडोळी, हिरेजडित कंकण, मोहराची माळ, चंद्रहार, कौस्तुभमणी, अनेक प्रकारचे लहान-मोठे टोप व मुकुट आहेत. हे टोप सुरेख कलाकुसर केलेले असून त्यापैकी काही टोप रत्नजडित आहेत. तसेच सोन्याची अतिशय सुंदर पगडी देखील बनविण्यात आली आहे. देवाच्या कपाळावर जो गंध लावला जातो, त्यावर हिरेजडित नाम लावण्यात येतो.

सोन्याचे कडी जोड, तोडे जोड, मारवाडी हार, बाजूबंद, सोन्याचे पितांबर, मोत्याच्या माळा, पाय झुबे, तोरडी जोड, मोत्याचे तुरे आदी अनेक प्राचीन आणि अमूल्य दागिने देवाच्या खजिन्यात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com