मुख्यमंत्र्यांचा तासभर पाठलाग केला पण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

यात्रा पुढे आणि तो मागे, असा तासभर प्रवास सुरू होता. परंतु, मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची गळाभेट झालीच नाही. हा पाठलाग केला ७५ हजार रुपये किमतीच्या आणि साडेचारशे किलो वजनाच्या पुष्पहाराने.  हा पुष्पहार क्रेनच्या साहाय्याने मुख्यमंत्र्यांना घालण्यात येणार होता; पण शेवटपर्यंत तो हार आणि क्रेन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलीच नाही.

कोल्हापूर - महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांची गळाभेट घेण्यासाठी ‘तो’ मुख्यमंत्र्यांचा पाठलाग करत होता. सकाळपासून तो ताराराणी चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतीक्षा करत होता; पण महाजनादेश यात्रा पंचशील हॉटेलच्या दारातून सुरू झाल्याने त्याला पहिली हुलकावणी येथेच मिळाली. यात्रा पुढे आणि तो मागे, असा तासभर प्रवास सुरू होता. परंतु, मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची गळाभेट झालीच नाही. हा पाठलाग केला ७५ हजार रुपये किमतीच्या आणि साडेचारशे किलो वजनाच्या पुष्पहाराने.  हा पुष्पहार क्रेनच्या साहाय्याने मुख्यमंत्र्यांना घालण्यात येणार होता; पण शेवटपर्यंत तो हार आणि क्रेन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचलीच नाही. 

त्याचे असे झाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी कोल्हापूरच्या ताराराणी चौकातून सुरू होणार होती. त्याची चार-पाच दिवसांपासून जय्यत तयारी कोल्हापुरात सुरू होती. मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी युवा नेत्याच्या एका कार्यकर्त्याने तब्बल साडेचारशे किलो वजनाचा महापुष्पहार तयार केला. 

७५ हजार रुपये किमतीचा हा पुष्पहार मुख्यमंत्र्यांना घालण्यासाठी क्रेनची आवश्‍यकता लागणार होती. त्याचीही व्यवस्था केली. सकाळी दहा वाजल्यापासून युवा नेत्याचे कार्यकर्ते ताराराणी चौकात प्रतीक्षा करत होते; पण महाजनादेश यात्रा पंचशील हॉटेलच्या दारातून सुरू झाली. जेव्हा कार्यकर्त्यांना हे समजले, त्यावेळी पुष्पहार आणि क्रेन घेऊन कार्यकर्ते त्या दिशेने गेले; पण मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दरम्यानच्या काळात व्हीनस कॉर्नर, दसरा चौकाच्या दिशेने गेली होती.

त्यामागोमाग तो हार घेऊन क्रेन जात होती. अखेर मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा शहरातील सर्व मार्ग पूर्ण करून कळंबा येथे पोहोचली. तेथे मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटे भाषण केले. हार घेऊन तेथे पोहोचणार इतक्‍यात क्रेन बंद पडली. त्यामुळे त्या महापुष्पहाराला मुख्यमंत्र्यांची गळाभेट झालीच नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He follow Chief Minister Devendra Fadnavis but not meet