सासूच्या नेत्रदानासाठी जावयाने केला तीनशे किलोमीटर प्रवास

किरण चव्हाण 
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

माढा ( सोलापूर) : सासूच्या नेत्रदानासाठी जावयाने ६८ वर्ष वयाच्या माढ्यातील नेत्ररोग तज्ञाला बरोबर घेऊन रात्र जागून तीनशे किलोमीटरचा प्रवास करत काढून केला

माढा ( सोलापूर) : सासूच्या नेत्रदानासाठी जावयाने ६८ वर्ष वयाच्या माढ्यातील नेत्ररोग तज्ञाला बरोबर घेऊन रात्र जागून तीनशे किलोमीटरचा प्रवास करत काढून केला

माढयातील कापड व्यापारी विशाल शहा यांच्या सासू सुनीता दोशी (वय ८५ रा. बारामती) यांचे  बारामती येथे राहत्या घरी रविवारी (ता. २) संध्याकाळी सव्वा नऊच्या सुमारास निधन झाले.  शहा यांना पत्नी निरुपामा यांचा रात्री नऊच्या सुमारास फोन आला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने बारामती येथे नेत्रदान करणे अशक्य होते. शहांना आपल्या सासूचे नेत्रदान करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी माढयातील काही डॉक्टरांना याबाबत विचारणा केली. यावेळी डॉ. अशोक मेहता यांनी आपण नेत्रपटल काढण्यासाठी माढ्यातून बारामती येथे येण्यास तयार आहोत असे सांगितले. या अगोदरही डॉ. मेहता यांनी आपल्या स्वतःच्या आईच्या निधनानंतर स्वतःच त्यांचे नेत्रपटल काढून दान केले होते. 

शहा यांनी  डॉ. मेहता यांना बरोबर घेऊन माढयातील सन्मती नर्सिंग होम येथील डॉ. रमण दोशी यांच्या दवाखान्यातून नेत्रदानासाठी आवश्यक असणारी साधने घेतली. त्यानंतर मध्यरात्रीही डॉ. अभयकुमार यांनी त्यांच्या दवाखान्यात ही साधने निर्जंतुकीकरण करून दिली. त्यानंतर माढा ते बारामती असा सुमारे दीडशे किलोमीटरचा प्रवास या दोघांनी रात्री केला. पहाटे दोनच्या सुमारास बारामती येथे पोहोचल्यानंतर डॉ. मेहता यांनी मयत सुनिता दोशी यांचे नेत्रपटल काढले. त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन हे नेत्रपटल त्यांनी सोलापूर येथील डॉ. नवनीत तोष्णीवाल यांच्याकडे पोहच केले.

सासूच्या नेत्रदानासाठी जावाई विशाल शाह यांनी केलेली धडपड व त्याला ६८ व्या वर्षी साथ दिलेल्या डॉ. अशोक मेहता यांचं कौतुक सध्या सोशल मीडियावर होत आहे. विशाल शाह यांनी या अगोदरही अनेकांच्या नेत्रदानासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचे वडील आणि प्राणीमित्र विलास शहा यांनीही ९३ जणांचे नेत्रदान व ७७ लोकांच्या देहदानासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. विलास शहा यांनी स्वतःच्या पत्नीचेही देहदान केले. डॉ. अशोक मेहता यांचे नेत्र क्षेत्रातील योगदान मोठे आहे. सध्या माढा परिसरात नेत्रदानासाठी केलेल्या धडपडीची मोठी चर्चा आहे.

Web Title: he travel Three hundred kilometers journey for mother-in-laws Eye donation

टॅग्स