... तो खोल पाण्यात बुडाला 

विलास कुलकर्णी
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

जांभळी (ता. राहुरी) येथे मुळा धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यात त्या तरुणाने सवंगड्यांसह भक्तिभावाने बाळुमामाची मेंढरं धुतली. नंतर, अथांग पाण्यात पोहण्यासाठी त्याने उडी घेतली. खोल पाण्यात गेल्यावर त्याचा दम तुटला. तो पुन्हा वर आला नाही. तो बुडाल्याचे सवंगड्यांच्या लक्षात आले. आरडाओरड, शोधाशोध सुरू झाली. दीड तासांच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.

राहुरी : जांभळी (ता. राहुरी) येथे मुळा धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यात त्या तरुणाने सवंगड्यांसह भक्तिभावाने बाळुमामाची मेंढरं धुतली. नंतर, अथांग पाण्यात पोहण्यासाठी त्याने उडी घेतली. खोल पाण्यात गेल्यावर त्याचा दम तुटला. तो पुन्हा वर आला नाही. तो बुडाल्याचे सवंगड्यांच्या लक्षात आले. आरडाओरड, शोधाशोध सुरू झाली. दीड तासांच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. प्रशांत उत्तम खांडेकर (वय 17, रा. जांभळी, ता. राहुरी) असे मृत मुलाचे नाव आहे. 

वावरथ-जांभळी परिसरातील घटना 
काल (शनिवारी) सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. ढवळपुरी (ता. पारनेर) दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. आदिवासी व धनगर समाज बहुल असलेल्या वावरथ-जांभळी परिसरात मागील पंधरा दिवसांपासून बाळुमामांची मेंढरं वास्तव्यास आहेत. या मेंढरांच्या कळपाला धनगर समाजात धार्मिक अधिष्ठान आहे. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अन्नदान करण्यासाठी प्रशांतचे वडील बाहेरगावी किराणा सामान आणण्यासाठी गेले होते. 

मित्रांसोबत मेंढरं धुण्यासाठी गेला 
शनिवारी सकाळी प्रशांत हा आप्पा बाचकर, अनिल खेमनर, अंकुश बाचकर या मित्रांसमवेत बाळुमामांची मेंढरं धुण्यासाठी गेला होता. मुळा धरणाच्या जल फुगवट्याच्या पाण्यात त्यांनी मनोभावे मेंढरं धुतली. काम पूर्ण झाल्यावर पोहण्यासाठी त्यांनी पाण्यात उड्या मारल्या. अथांग पाण्यात खोलवर उडी घेतल्यावर पाण्यावर येईपर्यंत प्रशांतचा दम तुटला. तो पाण्यात बुडाला. प्रशांत दिसत नसल्याचे लक्षात आल्यावर मित्रांनी आरडाओरड करून, शोधाशोध सुरू केली. परंतु, प्रशांतचा ठावठिकाणा लागला नाही. 

दीड तासानंतर मृतदेह बाहेर 
जांभळीचे सरपंच रामदास बाचकर, उपसरपंच पाटीलबा बाचकर, नामदेव खेमनर, दादा बाचकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. भागवत पवार, भाऊराव पवार, रामनाथ पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्यात शोधमोहीम सुरू केली. दीड तासांच्या प्रयत्नानंतर प्रशांतचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. 

होडीतून मृतदेह रुग्णालयात 
मुळा धरणाच्या पाण्यामुळे वावरथ, जांभळी, जांभुळबन ही गावे बेटासारखी आहेत. मुळा धरणातून एक किलोमीटर प्रवास करून, ग्रामस्थांना राहुरीत यावे लागते. प्रशांतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी होडीतून राहुरीत आणण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी पाच वाजता मृतदेह प्रशांतच्या कुटुंबाकडे सोपविण्यात आला. काल रात्री उशिराने प्रशांतवर अंत्यसंस्कार झाले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He was drowned in deep water