अपक्षांमुळे वाढली उमेदवारांची डोकेदुखी

अपक्षांमुळे वाढली उमेदवारांची डोकेदुखी

सोलापूर - मोठ्या कष्टाने महापालिकेच्या निवडणुकीचे तिकीट पक्षाकडून मिळवले. प्रचार सुरू केला, पण आता निवडणूक मध्यावर आली असता अपक्ष उमेदवारांच्या धुमधडाक्यात सुरू असलेल्या प्रचारामुळे विविध पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपुढील डोकेदुखी वाढली आहे.

अनेक ठिकाणी तर अधिकृत उमेदवारावर नाराज लोक अपक्षांच्या पाठीशी आपली ताकद उभी करत आहेत. हा प्रकार कुठे उघडपणे तर कुठे चोरीछुपे सुरू आहे. यामुळे अधिकृत उमेदवारांपुढे अपक्षांचेच आव्हान काही वॉर्डात दिसून येत आहे. यामुळे पक्ष चिन्हावर उभारलेले अधिकृत उमेदवार अडचणीत येऊ शकतात. त्याचा हा आढावा...

प्रभाग १, २, ३ व ४ मधील चित्र

दोन नगरसेविकांची धडक
महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग एक ते चारमध्ये २६ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी विद्यमान नगरसेविका इंदिरा कुडक्‍याल आणि सुवर्णा हिरेमठ यांचे पक्षाकडून तिकीट कापल्याने त्यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले आहे. कुडक्‍याल यांना शिवसेनेने पुरस्कृत केले आहे. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ. किरण देशमुख भाजपकडून प्रभाग दोनमधून लढत आहेत. येथे अपक्षांची डोकेदुखी कमी आहे. कल्पना चिनकेरी, छाया कांबळे हे दोनच उमेदवार आहेत. सर्वांत जास्त अपक्ष उमेदवार प्रभाग तीन, प्रभाग चारमध्ये आहेत. प्रभाग क्रमांक एकमधून सुशांत कांबळे, राजकुमार सोनवणे, सना बागवान, रेणुका गुंड, वंदना मोरे, रवी गुब्याडकर, लक्ष्मण विटकर असे सात अपक्ष उमेदवार आहेत. भाजपकडून रवींद्र गायकवाड, राजश्री कणके, निर्मला तांबे, अविनाश पाटील, शिवसेनेकडून प्रभाकर काशीद, अर्चना यलशेट्टी, लक्ष्मी भोळे, रमेश व्हटकर यांच्यासह बहुजन समाज पक्ष, भारिप बहुजन महासंघ, रिपाइंच्या उमेदवारांना ते टक्‍कर देणार आहेत. 

प्रभाग तीनमधून दशरथ जमादार, सुवर्णा घोडके, इंदिरा कुडक्‍याल, सत्यनारायण अन्नलदास, महादेवी बिद्री, विजय मद्दा, स्वाती बडगू, सुवर्णा हिरेमठ अपक्ष लढत आहेत. या ठिकाणी भाजपकडून सूर्यकांत पाटील, अंबिका पाटील, भारती इप्पलपल्ली, सुदीप चाकोते, संजय कोळी असे तुल्यबळ उमेदवार उभे आहेत. प्रभाग चारमधून राजशेखर पाटील, वृषाली चव्हाण, विजया कावळे, यल्लबाई कोळी, देवेंद्र लोंढे, केदार म्हमाणे, सोमशंकर शेटे, मल्लिकार्जुन यणपे हे अपक्ष उमेदवार उभे आहेत. 

हे उमेदवार विनायक विटकर, गौतम भांडेकर, महादेव अलकुंटे, लता फुटाणे, सुरेखा काकडे, सुरेश बिद्री, महेंद्र निकते, अमित पाटील, जगदीश लिगाडे यांना आव्हान देत आहेत.

प्रभाग क्रमांक ५, ६, ७ व ८ मधील चित्र
विद्यमान झाले अपक्ष

महापालिका निवडणुकीत अपक्षांनी मुख्य पक्षाकडून लढत असलेल्या उमेदवारांच्या मनात धडकी भरवली आहे. यामध्ये काही पक्षाचे नाराज कार्यकर्ते अपक्ष म्हणून लढत आहेत. काही तांत्रिक चुकांमुळे व पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे विद्यमान नगरसेविका अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत. 

प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये प्रमुख पक्षात सरळ पंचरंगी लढत होत आहे. ब मध्ये भाजपकडून तिकीट न मिळालेले नागनाथ तोडकरी अपक्ष लढत आहेत. त्याचबरोबर मल्लिनाथ काळे हेही अपक्ष लढत आहेत. या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला फटका बसण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पाच क मध्ये काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका मंदाकिनी तोडकरी या तांत्रिक चुकीमुळे अपक्ष लढत आहेत. त्यांना काँग्रेसने पुरस्कृत केले आहे. त्याचबरोबर भाजपने तिकीट नाकारल्याने रूपाली तोडकरी या अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत. पाच ड मध्ये मल्हारी पाटोळे, अमर पवार, रामचंद्र सरवदे यांनी अपक्षाच्या माध्यमातून मतदारांसमोर जाण्याचा निर्णय घेतला आहे.  प्रभाग सहा अ मध्ये विमल गेजगे, प्रमोद कसबे अपक्ष लढत आहेत. सहा मधील उर्वरित जागी पक्षीय लढत होत आहे. प्रभाग सात अ मध्ये सुमती जोजारे, तर ड मध्ये सूरज शिंदे अपक्ष लढत आहेत. शहराचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघातील प्रमुख पक्षातील उमेदवारांवर अपक्षाचा काही परिणाम होणार का? याबाबत उत्सुकता आहे. प्रभाग आठ ब मध्ये जयश्री महिंद्रकर, रेहाना बागवान, प्रभाग आठ क मध्ये भाजपच्या विद्यमान नगरसेविका सुरेखा अंजिखाने यांना पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्या अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत. त्याचबरोबर फिरोजा शेख या अपक्ष म्हणून मैदानात आहेत. आठ ड मध्ये गालिब कुरेशी, गोपीकृष्ण श्रीराम व सविता जोशी हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दोन विद्यमान नगरसेविका अपक्ष उभारल्यामुळे या प्रभागात चुरस निर्माण झाली आहे.

प्रभाग ९, १०, ११ व २४ मधील चित्र
‘जायंट किलर’ ठरणार?

प्रभाग नऊ, १०, ११ आणि २४ मध्ये एकूण १८ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामध्ये अनिता गौडा, मल्लेश बिराजदार, शेखर ईराबत्ती, ॲड. मोहन कुरापाटी, अरविंद शिंदे, श्रीनिवास यन्नम, उपेशकुमार भोसले, नागमणी जक्कन, तन्वीर मोमीन, सरस्वती पाटील, चंदू स्वामी, आकाश अभंगराव, मुसा अत्तर, संदीप जाधव, मोहन रजपूत, सुरेश स्वामी, रूपाली चोळ्ळे, स्मिता देशपांडे यांचा समावेश आहे. या प्रभागांमध्ये अधिकृत पक्षाच्या उमेदवारांमध्ये महापौर प्रा. सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, नगरसेविका राजश्री पाटील, गीता मामड्याल, नगरसेवक दत्तू बंदपट्टे, नागेश वल्याळ, मेघनाथ येमूल, विठ्ठल कोटा, राजकुमार हंचाटे, कुमुद अंकाराम व महेश कोठे या दिग्गजांचा समावेश आहे. या शिवाय पहिल्यांदाच निवडणुकीला उभारलेल्या भाजप-शिवसेना, माकप, रिपाइं, रासप उमेदवारही या प्रभागांतून रिंगणात आहेत. नागमणी जक्कन या यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेकांना ‘धक्का’ देणाऱ्या उमेदवार ठरल्या आहेत. यंदा त्यांच्यामुळे ‘कोणाला’ धक्का बसणार हे लवकरच स्पष्ट होईल. पक्षाने उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करून अपक्ष उभारलेल्यांची या प्रभागात गर्दी आहे. त्यामुळे अधिकृत पक्षाच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभागणी होणार, हे स्पष्ट आहे. अधिकृत पक्षांनी उभे केलेल्या उमेदवारांच्या भाऊगर्दीत एखादा अपक्ष ‘जायंट किलर’ ठरला तर तो धक्का कोणालाच सहन होण्यासारखा नसणार आहे.

प्रभाग १२, १३ व १४ मधील चित्र
नाकारलेल्यांचे आव्हान

प्रभाग १२, १३ व १४ मध्ये तब्बल २४ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये काही विद्यमान आणि माजी नगरसेवकांचा समावेश आहे. पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. नगरसेविका विजया वड्डेपल्ली, नगरसेवक पीरअहमद शेख, माजी नगरसेविका अस्मिता गायकवाड, सरिता वडनाल यांना तांत्रिक कारणामुळे ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या मतांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यांच्याशिवाय महेश्‍वरी स्वामी, रोशनबी नदाफ, नम्रता निंबाळकर, अविनाश खरटमल, तुषार खंदारे, छाया ठोकळ, कस्तुरबाई मेरगू, अशोक माचन, मुजाहिर शेख, सुभान शेख, महादेव घोडके, निरंजन बोद्दूल, पद्मिनी माने, हजरत विजापुरे, शमा सय्यद, बालमनी कस्सा, शिवाजी वाघमोडे, गंगाधर साठे आणि विशाल लोंढे हे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. 

१२ ‘ब’मध्ये अस्मिता गायकवाड व नम्रता निंबाळकर यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. निंबाळकरांना उमेदवारी मिळाली, मात्र तांत्रिक कारणामुळे त्यांचा बी फॉर्म अवैध ठरला. त्यामुळे या जागेवर शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवार नाही. अशीच स्थिती या प्रभागांतील इतर जागांवर आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने रिंगणात उतरलेल्या आजी-माजी नगरसेवकांमुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर अपक्षांच्या आव्हानामुळे आधीच अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्यातच स्वकीयांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यात भर पडणार आहे.

प्रभाग १५, १६, १७ व २६ मधील चित्र
चुरशीच्या लढतींमुळे कडवे आव्हान

प्रभाग क्रमांक १५, १६, १७  व २६ मध्ये एकूण २० अपक्ष उमेदवार पक्षांच्या उमेदवारांना चुरशीची लढत देणार आहेत. 

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, बसप, मनसे, माकपसारख्या पक्षांच्या उमेदवारांना कडवे आव्हान या उमेदवारांकडून मिळण्याची शक्‍यता आहे. प्रभाग १५ अ मध्ये एक, १५ ड मध्ये दोन, १६ अ मध्ये तीन, १६ ब मध्ये दोन, १६ क मध्ये एक, १६ ड मध्ये दोन, १७ ब मध्ये एक, २६ अ मध्ये सहा, २६ क मध्ये दोन असे २० अपक्ष उमेदवार उभे आहेत. तर १५ ब, १५ क, १७ अ, १७ क, १७ ड, २६ ब मध्ये एकही अपक्ष उमेदवार नाही. अपक्ष उमेदवारांमध्ये राणी कांबळे, अमोल जाधव, उदय सलगर, कल्पना मोडे, वैजंतीबाई नारायणकर, सुनीता उघडे, संजयकुमार कांती, संदीप बंडे, प्रीती कन्नूर, दीपक गवळी, विक्रम कसबे, मुस्ताक लालकोट, राजकुमार भुतनाळे, नागसेन डुरके, आ. के. कांबळे, दुशासन लालसरे, सुनील नेटके, विश्‍वनाथ व्हनकोरे, सुरेखा भुतनाळे, सविता माशाळे यांचा समावेश आहे.

संजय कांती, कल्‍पना मोडे यांनी बंडखोरी केली आहे. श्रीदेवी फुलारे, आरिफ शेख, चेतन नरोटे, फिरदोस पटेल, संजय हेमगड्‍डी, अनिता म्‍हेत्रे, बिस्‍मिल्‍ला शिकलगार, मेनका चव्‍हाण या विद्यमान नगरसेवकांसमोर अपक्ष उमेदवारांचे आव्‍हान असणार आहे.

या प्रभागामध्ये विविध राजकीय पक्षातून बंडखोरी केलेल्या काही उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे अधिकृत पक्षाच्या उमेदवारासोबत चुरशीची लढत पाहायला मिळेल. तसेच या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

प्रभाग क्रमांक १८, १९ व २० मधील चित्र
मातब्बरांनीही वाटतेय धास्ती

महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार मातब्बरांना टक्कर देणार आहेत. प्रभाग क्रमांक १८, १९ आणि २० या तीनही प्रभागांत निवडणूक लढवीत असलेल्या अपक्ष उमेदवारांची मातब्बरांनीही धास्ती घेतली आहे.

प्रभाग क्रमांक १८ ड मध्ये संतोष केंगनाळकर, सागर म्हेत्रे, अंबादास नडगिरे, इस्माईल शेख यांचे शिवसेनेचे देविदास चिन्नी, भाजपचे शिवानंद पाटील, काँग्रेसचे रमेश राठी, एमआयएमचे सादिक नदाफ यांना आव्हान असणार आहे.

१९ ब मध्ये अंबिका देवकर, ज्योती माळवदकर या काँग्रेसच्या सुजाता आकेन, भाजपच्या अनिता कोंडी यांची कोंडी करणार आहेत. प्रभाग क्रमांक १९ ड मध्ये अनिल सामल हे शिवसेनेचे गुरूशांत धुत्तरगावकर, भाजपचे सोमनाथ केंगनाळकर आणि काँग्रेसचे दीपक जाधव यांच्याशी दोन हात करणार आहेत. प्रभाग क्रमांक २० अ मध्ये प्रमोद गायकवाड, अनिल वाघमारे हे भाजपच्या बाळू गोणे, शिवसेनेचे रविकांत कोळेकर आणि काँग्रेसच्या प्रवीण निकाळजे यांना टक्कर देतील. प्रभाग २० ब मध्ये आरती मंद्रूपकर या शिवसेना पुरस्कृत अपक्ष भाजपच्या अर्चना वडनाल आणि काँग्रेसच्या अनुराधा काटकर यांच्याशी झुंज देणार आहेत. तसेच प्रभाग क्रमांक २० ड मध्ये बबलू शिवसिंगवाले यांचे शिवसेनेचे भीमाशंकर म्हेत्रे, बसपचे भूषण गायकवाड, काँग्रेसच्या मौलाबी सय्यद आणि समाजवादी पक्षाच्या अनिसमिया निटोरे यांना आव्हान असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com