पदाधिकाऱ्यांची मस्ती उतरवणार कोण?

प्रवीण जाधव
शनिवार, 19 मे 2018

पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष
गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी ‘मोका’सारखे कायदे लावून वठणीवर आणले आहे. परंतु, ते सत्ताधारी पक्षातील नव्हते. सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांकडून तोच न्याय अपेक्षित आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता ठोस कारवाई झाली तरच सर्वसामान्य नागरिक आश्‍वस्त होणार आहेत.

सातारा - पार्टी वुईथ डिफरन्स बिरुदावली मिरवणाऱ्या भाजपसह शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनाही आता सत्तेच्या मस्तीची लागण झालेली दिसते. वर्षभरातील अनेक घटनांमधून ते समोर येऊनही वरिष्ठ नेतृत्वाकडून पाठराखण केली जात असल्याने त्यांचे धाडस वाढतच चालले आहे. पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर पक्ष आणि पोलिस प्रमुखांकडून काय कारवाई होणार, याची सातारकरांना उत्सुकता आहे.

येथील रा. ब. काळे शाळेचे मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांना शासकीय विश्रामगृहात बोलावून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या कथित विनयभंगाची कबुली देण्यासाठी त्यांना मारहाण करण्यात आली. भीतीपोटी कबुली दिल्यावर त्यांना पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी झाली. सुसंस्कृत म्हणवणाऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडूनच हे कृत्य झाले आहे. भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांकडून आजवर असा प्रकार घडला नव्हता. उलट, दुसऱ्या पक्षाच्या अशा प्रवृत्तींवर या पक्षाकडून कायम बोट ठेवले जायचे. परंतु, आत त्यांचेच पदाधिकारीही त्याच वाटेने शहरात धिंगाणा घालत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. गुंडगिरीविरोधात संरक्षण करणारे म्हणून नागरिक भाजप-शिवसेनेकडे पाहात आहेत. त्याला खिळ घालण्याचे काम करणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांना पक्षाने पाठीशी घालू नये, अशीच सामान्यांची अपेक्षा आहे.

संबंधित पदाधिकाऱ्यांची ही काही पहिली घटना नाही. मध्यंतरी मटका चालकांकडून मारहाण झाली होती. त्यानंतर जुगाराचा अड्डा चालविल्याप्रकरणीही गुन्हा दाखल झाला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आशीर्वादाने ‘त्याचे’ उद्योग चालल्याचे शहरात सर्वत्र बोलले जात आहे. पक्ष सत्तेत येण्यापूर्वी चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणून या पदाधिकाऱ्याचे नाव होते. मात्र, सत्तेत येताच वेगळेच कारनामे समोर यायला लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या, अवैध धंद्यांत नाव येत असलेल्या पदाधिकाऱ्याला किती पाठीशी घालायचे, हे ठरविण्याची वेळ नेत्यांवर आली आहे.

शिवसेनेपुढेही पेच
या प्रकरणातील आणखी एक संशयित कट्टर शिवसैनिक म्हणून जिल्ह्याला माहीत आहे. सर्वसामान्यांसाठी व पक्षाच्या धोरणासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. त्यामुळे धाडसी कार्यकर्ता म्हणून ते जिल्ह्यात नावारूपाला आले. सामान्य घरातील कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, अशा कृत्यात नाव आल्याने शिवसेनेपुढेही पेच निर्माण झाला आहे. हा पक्षही काय कारवाई करणार, याबाबत उत्सुकता आहे.

Web Title: headmaster ransom case crime