आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा - विजया रहाटकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

सांगली - म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेबाबत निनावी तक्रार गतवर्षी आली होती. त्याची चौकशी करताना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

सांगली - म्हैसाळ (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेबाबत निनावी तक्रार गतवर्षी आली होती. त्याची चौकशी करताना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

त्या म्हणाल्या,""म्हैसाळ येथील भ्रूणहत्येचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून यंत्रणा सक्षम करण्याची गरज वाटते. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डॉक्‍टरांची बैठकही घेतली. शहरी आणि ग्रामीण भागातील दवाखाने, हॉस्पिटलची तपासणी करण्यासाठी पथक कार्यरत करा, अशा सूचना त्यात केल्या आहेत.'' 

रहाटकर यांच्या सोबत सदस्या नीता ठाकरे (नागपूर विभाग), जयाताई खरात (बीड), देवयानी ठाकरे (उत्तर महाराष्ट्र) यांनी म्हैसाळ येथे भेट दिली. हत्या केलेले भ्रूण पुरले, त्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सिव्हिल सर्जन संजय साळुंखे, आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेतली. 

बैठकीनंतर रहाटकर म्हणाल्या,""म्हैसाळ घटनेची राज्य महिला आयोगाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. संबंधित यंत्रणाना त्याबाबत आदेश दिले होते. डॉ. खिद्रापुरे याच्या हॉस्पिटलमधील भ्रूण हत्येचे कृत्य गंभीर आणि संतापजनक आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून डॉक्‍टरला अटक केली आहे. घटनेचा कसून तपास सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर यंत्रणा सक्षम करण्याची गरज वाटते. त्यासाठी दवाखाने, हॉस्पिटलची तपासणी करण्यासाठी पथके स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल आणि पोलिस यंत्रणा पथकांना जोडली आहे. म्हैसाळ येथील प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल. त्याचबरोबर जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यासही सांगितले आहे.'' 

त्या म्हणाल्या,""या प्रकरणाची माहिती घेताना 2016 मध्ये खिद्रापुरेबाबत एक निनावी पत्र येथील जिल्हाधिकाऱ्यांना आले होते. त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली; परंतु चौकशीत त्यांनी निष्काळजीपणा दाखवला. अधिक तपास करणे अपेक्षित होते. चौकशी करणाऱ्या समितीमध्ये जे कोणी होते, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाच्या कामगिरीबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. खिद्रापुरेच्या प्रकरणात ज्यांचा सहभाग निश्‍चित होईल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.'' 

यावेळी खासदार संजय पाटील, नगरसेविका स्वरदा केळकर, भारती दिगडे आदी उपस्थित होते. 

परिचारक प्रकरणी सुनावणी सुरू राहणार 
आमदार प्रशांत परिचारकांबाबत सुरू असलेल्या चौकशीबाबत विचारले असता रहाटकर म्हणाल्या, ""परिचारकांनी माजी सैनिक आणि त्यांच्या पत्नीबाबत जे वक्तव्य केले त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल याचिकेच्या सुनावणीमध्ये समन्स बजावले होते. काल तारीख होती. परिचारक यांच्या वकिलांनी आयोगापुढे हजर राहून शपथपत्र सादर केले. त्यामध्ये परिचारक यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. माजी सैनिक किंवा त्यांच्या पत्नीचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून बिनशर्त माफी मागत आहे. भविष्यात असा प्रकार घडणार नसल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. त्यांच्यावतीने बाजू मांडण्यात आली आहे. सुनावणी पुढे सुरू राहणार आहे.'' 

Web Title: Health Department default - vijaya