सर्वांना आरोग्य सुविधा देणे ही जबाबदारी - डॉ. अमोद गडीकर

प्रवीण जाधव
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

सातारा - जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देणे, ही जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी आहे. सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ती योग्य पद्धतीने पार पाडण्याचे काम केले जाईल. जिल्हा रुग्णालयातील सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नवीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी केले.

सातारा - जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा देणे, ही जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी आहे. सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने ती योग्य पद्धतीने पार पाडण्याचे काम केले जाईल. जिल्हा रुग्णालयातील सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नवीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी केले.

जिल्हा रुग्णालयातील विविध असुविधांबाबत ‘सकाळ’ने वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्यामध्ये रुग्णालयात असलेल्या विविध गैरसोयी मांडण्यात आल्या. या पार्श्‍वभूमीवर नवीन जिल्हा शल्यचिकित्सक यांची भूमिका जाणून घेण्यात आली. डॉ. गडीकर म्हणाले, ‘‘नुकताच जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार स्वीकारला आहे. रुग्णालयातील सर्व परिस्थितीची माहिती घेत आहे. प्रत्येक विभागातील सहकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. त्यातून अनेक गोष्टी समोर येत आहेत. जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे रुग्णांना उपलब्ध सर्व सुविधा चांगल्या दर्जाच्या व योग्य पद्धतीने मिळाल्या पाहिजेत, याला प्रथम प्राधान्य असणार आहे. जिल्हा रुग्णालयाबरोबरच सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांतही रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.’’ अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मात्र, उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून रुग्णांना कोणतीही अडचण होणार नाही, याची दक्षात घेण्यात येईल. शासनाकडून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच आवश्‍यक त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचीही मदत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागातही अनेक रुग्ण येत असतात. त्यात अनेक जण खूप लांबूनही येत असतात. त्यांनाही वेळेत चांगल्या सुविधा मिळणे आवश्‍यक असते. त्यामुळे सर्व वैद्यकीय अधिकारी वेळेत उपलब्ध असतील, याकडे कटाक्ष असणार आहे. रुग्णालयात सिटीस्कॅन, रक्त विघटन प्रक्रियेच्या सुविधा लवकर उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चेतून तातडीने तोडगा काढून रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीनेच मिळतील, असा विश्‍वास रुग्णांनी ठेवावा. त्यामुळे रुग्णांनी शासकीय रुग्णालयातील सुविधांचा कोणताही किंतू मनात न ठेवता लाभ घ्यावा. काही अडचणी असल्यास संबंधित विभागाचे अधिकारी किंवा माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. गडीकर यांनी केले.

Web Title: Health Facility responsibility Dr. Amod gadikar