कोल्हापूरः वर्षभरात तब्बल १२१ विद्यार्थ्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया

कोल्हापूरः वर्षभरात तब्बल १२१ विद्यार्थ्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया

गडहिंग्लज - बदलती जीवनशैली आणि आहारातील बदलामुळे मुलांना जन्मजात विविध आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये हृदयाच्या संबंधित आजाराचे प्रमाण अधिक असल्याचा निष्कर्ष शालेय आरोग्य तपासणीतून उघड झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात तब्बल अशा १२१ विद्यार्थ्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शून्य ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी केली जाते. २००८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांची वर्षातून दोनवेळा अशी तपासणी होते. यासाठी खास डॉक्‍टर, फार्मासिस्ट आणि आरोग्यसेविकांची नेमणूक असून स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.

गडहिंग्लजचेच उदाहरण घेतल्यास तालुक्‍यात दोन पथके कार्यरत आहेत. २८८ अंगणवाड्या आणि २०२ शाळा आहेत. ४० हजारांवर विद्यार्थी या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. एप्रिल २०१८ ते आजअखेर तालुक्‍यात एकूण २० हून अधिक विद्यार्थ्यांना हृदयाशी संबंधित आजार झाल्याचे निष्पन्न झाले. ८ गंभीर आजारी असलेल्या विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

जंकफूड घातक
सध्या जीवनशैली बदलत चालली आहे. त्यानुसार आहाराच्या शैलीतही फरक पडतोय. फास्टफूड, जंकफूडचे अतिसेवनही आरोग्याला घातक असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अहवालातून पुढे आला. यात चायनीज खाद्यपदार्थांचाही समावेश आहे. सर्वच घटकांनी आणि विशेष करून गरोदर महिला, शाळकरी मुलांनी तर असे खाद्यपदार्थ टाळायला हवेत, असेही डॉ. रेडेकर यांनी सांगितले. पालकांनी पाल्याच्या आजारांविषयी जागरूक राहून तत्काळ रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

तसेच काही विद्यार्थ्यांना औषधोपचाराची शिफारस तर काही किरकोळ हृदयरोगी विद्यार्थ्यांना वर्षभर वेळोवेळी तपासणीखाली घेतले आहे. जिल्ह्यात गतवर्षी (२०१७-१८) तब्बल १२१ गंभीर हृदयरोगी विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यातील ५० टक्के शस्त्रक्रिया या हृदयाच्या झडपाचे झाले आहेत.

२५ टक्के विद्यार्थ्यांचे ओपन हार्ट सर्जरी झाली आहे. यामध्ये हातकणंगले तालुक्‍यातील विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ३५ इतकी आहे. त्या खालोखाल करवीरचा (१४) क्रमांक लागतो. 
दरम्यान, शालेय आरोग्य तपासणीत इतर आजार झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आढळली आहे. ही संख्या जिल्ह्यात १२०० वर आहे. 

एप्रिल २०१८ ते आजअखेर तालुक्‍यात हर्निया, हायड्रोसील, अॅपेंडिक्‍स, अस्थिव्यंग, डोळ्यांचा तिरळेपणा, शरीरावरील गाठी, लघवी आदी आजाराच्या शंभरावर विद्यार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मोफत शस्त्रक्रियेत जिल्ह्यात गडहिंग्लज आघाडीवर आहे. सर्व शस्त्रक्रिया या उपजिल्हा रूग्णालय, सीपीआर किंवा खासगी दवाखान्यांतून करण्यात येतात.

खासगीमधील शस्त्रक्रियांचा खर्च हा शासन महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करते. तालुक्‍यात डॉ. रमेश रेडेकर, डॉ. सुनंदा वाईंगडे, डॉ. सुजित आणुरे, डॉ. सुशांती पाटील या डॉक्‍टरांसह फार्मासिस्ट, आरोग्य सेविका शालेय आरोग्य तपासणीसाठी कार्यरत आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे यांच्या मार्गदर्शनाने तालुक्‍यात योजनेची अमलबजावणी सुरू आहे. 

फोलीक ॲसिड गोळ्यांचे महत्व
एखाद्या गावातील अथवा शहरातील महिला गरोदर राहिल्याचे सरकार दप्तरी नोंद होताच आरोग्य केंद्राकडून त्यांना फोलीक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात. त्या गोळ्या सलग तीन महिने घ्याव्या लागतात. याकडे अनेक गरोदर महिला दुर्लक्ष करतात. या गोळ्या घेतल्यास मुलांना जन्मजात होणारे आजार टाळता येतात. गरोदर राहण्यापूर्वी तीन आणि नंतर तीन अशी सहा महिने गोळ्या घेतल्या तर ९९ टक्के अपत्य निरोगी असतात असे आरोग्य तपासणी पथकाचे प्रमुख डॉ. रमेश रेडेकर यांनी सांगितले.

तालुकानिहाय विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया (२०१७-१८)
तालुका    हृदय शस्त्रक्रिया     इतर शस्त्रक्रिया
गडहिंग्लज     ८    १५८
शिरोळ     १०     १९८
आजरा     ३     ८५
भुदरगड     ४     ८५
हातकणंगले    ३५    २६१
पन्हाळा    ५    ११६
चंदगड    ८     ६१
राधानगरी     ३     ३४
कागल     १०     ४६
गगनबावडा     २     २१
शाहूवाडी     ५     २१
करवीर     १४     १७३
कोल्हापूर महापालिका     ११     ७०
सर्व पालिका     ३     १९
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com