पावसाने आटपाडीकरांची दैना; हातातोंडाची पिके जणार

नागेश गायकवाड
Saturday, 19 September 2020

आटपाडी तालुक्‍यावर नेहमी रुसणाऱ्या वरूनराजाने यावर्षी चांगलेच झोडपून काढले आहे. अति पावसामुळे हाता तोंडाला आलेली खरिपाची पिके शेतात पावसाच्या पाण्यात सडत आणि कुजत चालली आहेत. 

आटपाडी (जि . सांगली) : आटपाडी तालुक्‍यावर नेहमी रुसणाऱ्या वरूनराजाने यावर्षी चांगलेच झोडपून काढले आहे. हक्काचा परतीच्या मॉन्सूनचा प्रवास सुरू होण्याअगोदरच तब्बल 500 मिलिमीटरचा टप्पा घातला आहे. अति पावसामुळे हाता तोंडाला आलेली खरिपाची पिके शेतात पावसाच्या पाण्यात सडत आणि कुजत चालली आहेत. 

आटपाडी तालुक्‍याच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला असतो. मान्सूनचा पाऊस तसा पडतच नाही. जो पडतो तो परतीचा. दरवर्षी तालुक्‍याची सरासरी दोनशे ते अडीचशे मिलिमीटर असते. मात्र गेल्या दोन वर्षापासून सरासरीच्या दुप्पट पाऊस कोसळत आहे. यावर्षी आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची 500 मिलिमीटर नोंद झाली आहे. खरिपाची मूग, उडीद, मटकी, भुईमूग, बाजरी पिके हाता तोंडाला आली आहेत. मात्र काढणीसाठी पाऊस उसंतच देत नसल्यामुळे पिके शेतातच कुजत चालली आहेत. यामुळे रब्बीचा हंगाम पुढे जाणार आहे. 

याशिवाय अति पावसाचा प्रचंड मोठा फटका डाळिंब आणि द्राक्ष बागांना बसला आहे. डाळिंब बागात मोठ्याप्रमाणात फुलगळ झाली. जी फळे आली त्यांना पाकळी करपा, फळकुज, तेलकट या बुरशीजन्य रोगांनी घेरले आहे. अक्षरश: शेतकऱ्यांना फवारण्या ही करता येईनात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्‍याची मुख्य माणगंगा नदी, आटपाडीचा शुक ओढा, करगणीचा बेलवन ओढा आणि गावोगावचे लहान-मोठे ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. यंदाच्या अति पावसामुळे दोन दुर्घटनेत चौघांचा बळी गेला आहे. 

नुकसान भरपाई द्या
माणदेशी आटपाडी तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे माळवदे घराचे प्रमाण मोठे आहे. अति पावसात ही घरे टिकाव धरत नाहीत. पाऊस जादा होऊ लागल्यामुळे माळवदी घरांना गळती लागली आहे. शिवाय अनेक घरांच्या मोठमोठ्या जुन्या भिंती कोसळून घरे पडू लागली आहेत. कुरुंदवाडीत अनेक घरे पडले असून, त्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी गावच्या सरपंच सौ. सविता वगरे यांनी केली आहे.  

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in Atpadi Taulka will affect crops