चांदोली ते उमदी...हाहाकार; दिवसात उच्चांकी पाऊस; आजही दिवसभर मुक्कामाचा अंदाज

Heavy rain during the day in Sangali; Even today, the forecast for the day's stay
Heavy rain during the day in Sangali; Even today, the forecast for the day's stay

सांगली ः परतीच्या वादळी पावसाचा जिल्ह्यातील तडाखा कायम आहे. आज दिवसात सुमारे 12 तासांवर अधिक काळ पावसाने अक्षरशः धुवून काढले. चांदोलीपासून उमदीच्या टोकापर्यंत आज पावसाने असे काही धुतले, की दुष्काळी भागालाही आज पाऊस नको म्हणायची वेळ आणली. 

सकाळी साडेसात सुरू झालेली मुसळधार रात्री उशिरापर्यंत कायम होती. जाणकारांच्या मते आजचा पाऊस सन 2005 नंतरच्या पावसाळ्यानंतर दिवसांतील उच्चांकी असू शकेल. या पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे पुरते मोडले आहे. ऊस, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मका, केळी आणि भाजीपाला पुरता भुईसपाट झाला. जिल्ह्यातील ओढे, बंधारे, तलाव, नाले ओसंडून वाहत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात उद्या (ता. 15) ही दिवसभर पाऊस कोसळणार असून शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होईल. आजचा अतिवृष्टीचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. 

राज्यमार्गावर पाणी 
जिल्ह्यातील 3 राज्यमार्ग, 15 प्रमुख जिल्हामार्ग पाण्याखाली गेल्याने या ठिकठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. छोटे फरशी पूल पाण्याखाली गेलेत. एसटीसह सर्व वाहतूक ठप्प झाली. मालवाहतुकीवरही परिणाम झाला. जागोजागी ट्रक्‍स थांबून होते. 

सांगलीत रस्ते तुंबले 
संततधारेमुळे सांगलीत शामरावनगरसह उपनगरांत दैना झाली. घरांत पाणी घुसले. पाणी निचऱ्यासाठी पंपही बसवण्यात आले. गांधी कॉलनी, तुळजाईनगर परिसरात नाल्याचे पाणी घरांत घुसले. स्टेशन रोड, राजवाडा चौक, एसटी स्टॅंड परिसरात पाणी साचून तळी तयार झाली. मात्र मारुती चौकात पाण्याचा लवकर निचरा झाला. स्टेशन रोड ते राजवाडा चौकापर्यंत पाण्याचे लोंढे वाहत होते. जामवाडी, दत्तनगर परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना बाहेर पडणे मुश्‍कील झाले. बाजारपेठेतही पावसाने थैमान घातले. व्यापारी, विक्रेत्यांना फटका बसला. 

जुना कुपवाड रोड परिसरातही नाल्याचे पाणी तुंबल्यामुळे घरांत पाणी घुसले. जुना कुपवाड रोड चैत्रबन ते गांधी कॉलनी मार्गावरील नाला चुकीच्या पद्धतीने दुरुस्त केल्याचा फटका बसून तुळजाईनगर परिसरात पाणीच पाणी झाले. गांधी कॉलनी, नेहरू नगर येथील काही घरात पाणी शिरले. नागरिकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू राहिल्याने पंचाईत झाली. 

आटपाडीतील 16 पूल पाण्याखाली 
आटपाडी तालुक्‍यात दिघंची ते राजेवाडी जाणारे दोन्ही पूल, आंबेवाडी पूल, आटपाडी ते आवळाई, आटपाडीतील मुख्य फरशी पूल, खरसुंडी ते वलवण पूल, आटपाडी ते दिघंची राज्यमार्गावरील पूल, शेटफळे ते रेबाईमळा, शेटफळे ते करगणी पुल, माळेवाडी पूल, करगणी ते तळेवाडी, करगणी ते चिंचघाट, शेडगेवाडी ते बनपुरी, खरसुंडी ते आटपाडी पूल, खरसुंडी ते नेलकरंजी पूल, अर्जुनवाडी ते गोमेवाडी पूल, पिंपरीखुर्द ते बोंबेवाडी असे सोळा पूर पुल पाण्याखाली गेले आहेत. 

आठवडा पावसातच 
जिल्ह्यात 10 ते 12 ऑक्‍टोबरदरम्यान जोरदार पाऊस झाला. मंगळवारी थोडी उसंत घेतल्यानंतर बुधवारी सकाळी साडेसातपासून मुसळधार सुरू झाली. शेतीच्या कामांना किमान आठ-दहा दिवसांचा ब्रेक लागेल. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पुढे आली आहे. ऊसतोडी सुरू होण्याच्या काळात फड भुईसपाट झालेत. मंगळवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी धो धो सुरू झाला. आज सकाळी सातपासूनच सलामी दिली. दिवसभर दुपारी एक ते तीनच्या दरम्यान काहीशी उसंत घेतली. नंतर सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरुच होता.

दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. जलसंपदाकडे आज दिवसभरच्या पावसाच्या नोंदी प्राप्त झाल्या नव्हत्या. गेल्या आठवड्यात दुष्काळी भागात शंभर मिलिमीटर पावसाची नोंद एका दिवसांत झाली होती. त्यापेक्षा अधिक आज पाऊस झाला असावा असा अंदाज आहे. बुधवारी दिवसभरातील पाऊस यंदाच्या नव्हे तर पंधरा वर्षातील उच्चांकी असू शकतो. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com