पाऊस इथला थांबत नाही

kolhapur-rain
kolhapur-rain

कोल्हापूर - जेथे क्षणभरही पाऊस थांबत नाही, असे जिल्ह्यात एक गाव आहे. नुसता पाऊसच नाही तर पावसाबरोबर घोंगावणारा वारा आणि धुक्‍याचे ढग आहेत. पाऊस, वारा धुक्‍यामुळे गारठून गेलेल्या आख्ख्या गावाने प्रत्येक घरात ऊबदार शेकोटी करून स्वतःला कोंडून घेतले आहे. पावसाळ्याच्या या काळात दिवस मावळला की घराबाहेर कोणी पडायचे नाही, असा या गावाचा अलिखित नियम आहे. कारण बिबट्याचा वावरही गावात ठरलेला. महाराष्ट्राचे चेरापुंजी अशी ओळख असलेल्या किटवडे (ता. आजरा) या गावाची ही स्थिती आहे. 

आजरा-आंबोली रस्त्यावर आंबोलीच्या अलिकडे दहा किलो मीटरवर हे गाव आहे. गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर कोकणात उतरणारी खोल दरी  आहे. त्यामुळे कोकणातून येणारे ढग एका घळीतून थेट या गावावरच येतात आणि गावाला चिंब चिंब करून जातात. ढगाबरोबरच दरीतून उसळणारे वारेही किटवडे गावाला अक्षरशः घुसळवून टाकते. त्यामुळे पावसाळ्यात किमान तीन महिने क्षणभराचीही उघडीप मिळत नाही. इथल्या पर्जन्य मापन केंद्रात सर्वाधिक पावसाची नोंद होते आणि महाराष्ट्राचे ‘चेरापुंजी’ अशीच ओळख अधिक गडद होते.

गावात केवळ दीडशे घरे आहेत. गावाच्या टोकाला दोन किलोमीटरवर दरी सुरू होते व ही दरी कोकणात शिवापूर या गावाला जाऊन भिडते. या दरीतूनच पावसाचे ढग घाटमाथ्यावर येतात आणि दरीलगत असलेल्या किटवडे गावावरच पहिल्यांदा कोसळतात. यामुळे पावसाळ्यात किमान तीन महिने तेथे अखंड पाऊस सुरू राहतो.

गावात सततच्या पावसाने शेतीचे स्वरूपही बदलले आहे. येथे भात, नाचणा व ऊस ही पिके आहेत. पण भाताची लावण झाल्यावर पावसाच्या माऱ्यामुळे कुजते. खतेही वाहून जातात. त्यामुळे उसाचे एकरी उत्पादन निम्मावर येते. तरीही अन्य पर्याय नसल्याने लोकांना शेतीत राबावे लागते. भाताच्या खाचरांना नदीचेच स्वरूप येते.

गावाभोवती जंगल असून बिबट्याचा वावर नित्याचा आहे. दिवस मावळला की लोक शेतीची कामे आटोपून घरी येतात. कारण बिबट्या व गव्यांची भीती आहे. पंधरा दिवसांपूर्वी पुंडलिक पाटील यांच्या घराच्या कट्ट्यावर बसलेले कुत्रे बिबट्याने उचलून नेले. गव्यांचा कळप तर बिनधास्त फिरत असतो. उगवलेल्या भाताचाच नव्हे तर लावण केलेल्या रोपांचाही फडशा पाडतो. 

पिढ्यान्‌पिढ्या अनुभव 
वर्षानुवर्षे, पिढ्यान्‌पिढ्या गावाने मुसळधार पाऊस अनुभवला आहे. एकट्या या गावात जितका पाऊस वर्षाला पडतो, तितका पाऊस उर्वरित राज्यात पडतो.

रोजच अतिवृष्टी
१९९४ साली ८ हजार ९९७ मिलिमीमटर पाऊस फक्‍त किटवड्यात झाला. राज्यात पडलेल्या एकूण पावसाच्या दुप्पट पाऊस या एकाच गावात झाला. गेल्यावर्षी ७ हजार ६२३ मिलिमीटर पाऊस झाला. या वर्षी काल एका दिवसात २७० मिलिमीटर पाऊस झाला. ६५ मि.मी.च्या वर म्हणजे अतिवृष्टी मानली जाते. किटवड्यात अशी रोजच अतिवृष्टी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com