मुसळधार पावसाने पश्‍चिमेकडे नुकसान 

मुसळधार पावसाने पश्‍चिमेकडे नुकसान 

सातारा  - गेले चार दिवस जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात संततधार पाऊस सुरू आहे. या संततधारेमुळे कास, बामणोली, कोयनानगर भागातील जनजीवन विस्कळित झाले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर दरडी कोसळल्या, झाडे उन्मळून पडली. पाणी घुसल्याने शेती, शेतपिकांचे नुकसान झाले आहे. खर्शीत घराची भिंत कोसळल्याने तिघे जखमी झाले. दापवडीतही दोन घरांच्या भिंती कोसळल्या. गोटेतील धरणाच्या नाल्याचा भराव खचल्याने नदीची पाणीपातळी वाढून पाणी शेतात घुसले. भांबवली- तांबी रस्ता बंद झाल्याने पुण्याचे काही पर्यटक अडकून पडले आहेत. 

गोटेवाडीत शेतात घुसले पाणी 
उंडाळे - गोटेवाडी (ता. कऱ्हाड) येथे बांधकाम सुरू असलेल्या धरणाच्या नाल्याचा भराव वाहून गेल्याने धरणाखालील ओढ्याच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. त्याचबरोबर दक्षिण मांड नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने गोटेवाडी, गणेशवाडीसह येळगाव परिसरात धरण फुटल्याच्या अफवेने घबराट पसरली. सध्या धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून वाहनांच्या रस्त्यासाठी नाला भरल्यामुळे नाला तुंबून धरणात पाणी साचले. त्या पाण्याच्या दाबाने नाल्यातील भराव वाहून गेल्याने धरणात साठलेले पाणी वेगाने ओढ्याच्या पात्रात घुसले. त्यामुळे ओढ्याच्या काठावरील शेतात पाणी घुसून शेते पिकांसह वाहून गेली. हे धरण सुरक्षित आहे. 

तोरणे गावाचा संपर्क तुटला 
कोयनानगर - गेल्या 24 तासांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लागवली. नवजात 339 मिलिमीटर (14 इंच) इतक्‍या उच्चांकी पावसाची नोंद झाली. कोयना, नवजा, महाबळेश्वरला मिळून 874 मिलिमीटर या रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात 24 तासांत पाच टीएमसीने वाढ झाली. दरम्यान, मुसळधार पावसामुळे कोयना विभागातील तोरणे गावाला जाणाऱ्या रस्त्यावर मोठी दरड कोसळली. त्यामुळे एका टोकाला असणारे तोरणे हे गाव संपर्कहीन झाले आहे. 

खर्शीत भिंत पडून तिघे जखमी 
सायगाव : गेले चार दिवस संततधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले असताना काल रात्री खर्शी तर्फ कुडाळ येथे घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाले. संजय मनोहर खरात (वय 55), त्यांची पत्नी अर्चना (वय 42) व मुलगा निखिल (वय 16) हे घरात झोपले असताना, पहाटे घराची भिंत कोसळली आणि त्या ढिगाऱ्याखाली मुलगा निखिल अडकला. संजय खरात व त्यांची पत्नी बाहेर पडली. पण, निखिल अडकला होता. त्या वेळी ग्रामस्थ व युवकांनी तातडीने ढिगारा बाजूला करत अडकलेल्या निखिलला बाहेर काढले. 

कोळघरला डोंगर भाग कोसळला 
कास - कास पठाराच्या पश्‍चिमेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगातील काही भाग आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोळघर (ता. जावळी) या गावच्या वरच्या बाजूस असलेल्या सह्याद्रीनगर-कोळघर-अंधारी या रस्त्यावर कोसळला. डोंगरातील सर्व राडारोडा, दगड-माती रस्त्यावर तसेच खालच्या बाजूस असलेल्या शेतात घुसली. काही घरांत पाण्याचा लोंढाही घुसला. भात तरवे गाडून जाण्याबरोबरच शेतात दगड, माती जावून शेती गाळाने भरली आहे. रस्त्याचेही नुकसान झाले आहे. 

बामणोली भागात वाहतूक ठप्प 
कास : यंदाच्या हंगामातील पावसाच्या तडाख्यात कास पठाराच्या परिसरातील तसेच बामणोली भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. 

कास गावालगत कास धरणाच्या नवीन कामासाठी बामणोली रस्त्यावर डांबराला खेटूनच चर काढल्याने त्या ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे बामणोलीकडे जाणारी वाहतूक बंद आहे. कोळघर गावानजीकही मोठी दरड कोसळल्याने हा रस्ताही ठप्प झाला आहे. कास तलाव पूर्ण भरल्याने मोठ्या सरीनंतर धरणाचे पाणी बामणोली रस्त्यावर येत असल्याने त्याचाही फटका बसत आहे. भांबवली-तांबी रस्त्यावर मोठे झाड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पुण्याचे 11 पर्यटक काल कारमधून 

या भागात गेले आहेत. रस्ता बंद झाल्याने तेही पलीकडे अडकून पडलेत. 

मेंढमध्ये जमीन खचल्याने धोका 
ढेबेवाडी : संततधार पावसाने लगतची जमीन खचल्याने मराठवाडी धरणाच्या जलाशयाजवळील मेंढ (ता. पाटण) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचा विजेचा खांब कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्‍यता आहे. या खांबावर प्रवाहित उच्चदाब वीजवाहिन्या असल्याने दुर्घटनेच्या भीतीने धरणग्रस्तांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजूबाजूची जमीन खचून मोठ्या भेगा पडल्याने केवळ विजेच्या खांबाला देण्यात आलेल्या तानाच्या आधाराने उभा असलेला हा खांब कोणत्याही क्षणी ताण उपसून रस्त्यात कोसळण्याची भीती आहे. या खांबावरून उच्चदाब वीजवाहिन्या गेल्या आहेत. 

साताऱ्यात झाड कोसळले 
सातारा - सातारा शहरात माची पेठेत कूपर कारखान्यानजीक घराच्या पायाचे भिंतींमधील दगड पडले. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्यावर हॉटेल ग्रीनफिल्डनजीक नीलगिरीचा वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडला. हा वृक्ष पडताना विद्युत खांबास धक्का बसल्याने खांबही वाकला. परिणामी परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. पालिकेच्या वतीने रस्त्यावर पडलेला वृक्ष हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. 

दापवडीत दोन घरांचे नुकसान 
भिलार : मुसळधार पावसाने दापवडी येथे दोन घरांच्या भिंती पडल्या आहेत. पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. विजय रांजणे व संजय रांजणे यांच्या घरांच्या भिंती पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. 
या मुसळधार पावसाने पाचगणी-करहर रस्त्याची दुर्दशा झाली असून गटाराअभावी सर्व पाणी रस्त्यावरून वाहत आहे. 

पाऊस उवाच... 
- नवजात 339 मिलिमीटर उच्चांकी पावसाची नोंद 
- कोयनेत 24 तासांत पाच टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ 
- गोटेवाडीत नदीपात्रातील पाणी शेतात घुसले 
- कास तलावातील पाणी रस्त्यावर 
- रस्ता बंद झाल्याने पुण्याचे पर्यटक भांबवलीत अडकले 
- खर्शीत तिघांना ग्रामस्थांनी वाचवले 
- मेंढमध्ये वीज खांबाजवळची जमीन खचली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com