Rain News : अतिवृष्टीचा बंगळूरसह दक्षिण कर्नाटकाला तडाखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain News

Rain News : अतिवृष्टीचा बंगळूरसह दक्षिण कर्नाटकाला तडाखा

बंगळूर - बंगळूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरांचे नुकसान झाले असून, बंगळुरात दोन स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर हासनमध्ये एक व्यक्ती ठार झाली असून, अतिवृष्टीमुळे शाळांना सुटी जाहीर केली आहे. पुढील तीन दिवस बंगळूरसह राज्यातील काही भागात जोरदार वृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बुधवारी कर्नाटकातील किनारी जिल्हे आणि डोंगराळ भागांसाठी ‘रेड अलर्ट’ केला.

बंगळूरमध्ये १२ तासांपेक्षा कमी कालावधीत ११४ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. परिणामी शहरातील सर्व झोनमधील जवळजवळ सर्व ड्रेनेज ओसंडून वाहू लागले. बंगळूरला बुधवारी पावसाचा इशारा दिला होता. मात्र, मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. बंगळूरमधील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे दोन तासांहून अधिक काळ वाहने रस्त्यावर उभी होती. बंगळूरमधील आरआरनगरचा लोकप्रिय ले-आउट आणि शहरातील इतर अनेक घरात पाणी शिरल्याने हाहाकार माजला.

सततच्या पावसामुळे सहा महिन्यांपूर्वी बांधलेली २० फूट उंचीची कंपाउंड भिंतही कोसळली आहे. मुसळधार पावसामुळे बंगळूरमधील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. बंगळूर शहर, बंगळूर ग्रामीण, चामराजनगर, चिक्कबळ्ळापूर, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, दावणगेरे, हसन, कोडगू, कोलार, मंड्या, म्हैसूर, रामनगर, शिमोगा आणि तुमकूर जिल्ह्यांसाठी गुरुवारी आणि शुक्रवारी ‘यलो अलर्ट’ जाहीर केला. संततधार पावसामुळे श्रीरंगपट्टणम येथील कृष्णराज सागर धरणाच्या पाण्याची पातळी १०० फुटांवर पोहोचली आहे.

बंगळुरात दोन ठार

ओसंडून वाहणाऱ्या एसडब्ल्यूडीमुळे, अनेक प्रमुख रस्ते आणि छोटे रस्ते ३-४ फूट पाण्याने तलावात बदलले आणि रात्री उशिरा प्रवाशांना त्यांची वाहने सोडून पुराच्या पाण्यातून जावे लागले. आरआरनगर, कोरमंगल, होसकेरीहळ्ळी, होरामावू , एचबीआर लेआउट आणि शहराच्या इतर भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने घरांचे नुकसान झाले. अतिवृष्टीत दोन मजुरांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

हासनमध्ये शाळांना सुटी

हासन जिल्ह्यात २४ तास मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. चन्नरायपट्टणम तालुक्यातील एम. के. होसूर गावातील शिवकुमार (२८) यांचा मृत्यू झाला आहे. शिवकुमार शाळेजवळून पायी जात असताना इमारत अचानक कोसळली. त्यामुळे तेथे शाळांना सुटी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाची पहाणी

आरआर नगर, होसकेरेहळ्ळी येथील पाऊसग्रस्त भागांना भेट देताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी पूरग्रस्त घरांच्या मालकांना २५ हजार रुपये आणि पावसात मृत्युमुखी पडलेल्या स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली. सततच्या पावसामुळे सकलेशपूर, होळेनरासीपूर आणि अल्लूर तालुक्यातील अनेक तलाव ओसंडून वाहत आहेत.