कोल्हापुरात धुव्वाधार; राधानगरी धरण 89 टक्के भरले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

राधानगरी - कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर धुव्वाधार पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सकाळी आठ ते दुपारी चार या आठ तासांतच धरणाची पाणी पातळी तब्बल सव्वाफुटाने वाढली.

राधानगरी - कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर धुव्वाधार पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सकाळी आठ ते दुपारी चार या आठ तासांतच धरणाची पाणी पातळी तब्बल सव्वाफुटाने वाढली. दुपारी चारपर्यंत राधानगरी धरणात 89 टक्के पाणी संचय झाला आहे. म्हणजे आठ तासांत तीन टक्के साठा वाढला. पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची यंदाची ही पहिलीच वेळ आहे. आज सकाळपासून पावसाने कहरच केला आहे. 

काल पावसाने उघडझाप केल्याने आज सकाळपर्यंतच्या चोविस तासात साठ मिलिमिटर पावसाची नोंद झाली होती, तर केवळ एक टक्का साठा झाला होता. आज पहाटेपासून धुव्वादार सुरवात झाली. पाऊस इतका होता की सगळीकडे पाणीच पाणी झाले.

पाणलोट क्षेत्रातून पाणी आल्याने धरणातून 1400 क्‍यूसेकचा विसर्ग असूनही धरणाची पातळी झपाट्याने वाढली. आज दुपारी चारपर्यंत आठ तासातच तब्बल तीन टक्के वाढ झाली. सध्या धरणाचा पाणीसाठी 7.42 टीएमसी झाला आहे. काळम्मावाडी धरणपरिसरात 55 मिलिमिटर पाऊस झाला असून हे धरण 13.92 टीएमसी म्हणजे 58 टक्के भरले आहे. 

आज सायंकाळीही पावसाचा जोर कायम होता. दाजीपूर परिसरात मुसळधार सुरू असल्याने राधानगरी धरणाची पातळीत वाढ सुरु आहे. असाच जोर राहिल्यास लवकरच राधानगरी धरण भरण्याची शक्‍यता आहे. 

गगनबावड्यात पूरस्थिती शक्‍य 
असळज : गगनबावडा तालुक्‍यात आज सकाळपासून असणारा पावसाचा जोर संध्याकाळपर्यत कायम राहिला. तालुक्‍यास मुसळधार पावसाने झोडपले. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस पडत आहे. लखमापूर येथील कुंभी धरणक्षेत्रात 104 मिलिमीटर तर कोदे धरणक्षेत्रात 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कुंभी धरणातून 300 क्‍युसेक्‍सने तर कोदे धरणातून 743 क्‍युसेक्‍सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुंभी, धामणी, सरस्वती, रुपणी नद्यांची पातळी कमालीची वाढली आहे. कुंभी नदीवरील अणदूर, मांडुकली बंधारे पाण्याखाली आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

वारणातून 8201 क्‍यूसेक विसर्ग 
तुरुकवाडी : वारणा धरण पाणलोटक्षेत्रात पावसाची संततधार कायम असून कानसा, कडवी, वारणेची स्थिती जैसे थे आहे. विरळे-जांबूर पूल पाण्याखाली आहे. वाहतूक थावडेमार्गे सुरू आहे. कोकरुड-रेठरे दरम्यान वारणानदीवरील बंधारा पाण्याखाली आहे.

वाहतूक तुरुकवाडी मार्गे सुरु आहे. मालेवाडी-सोंडोली दरम्यानच्या पुलावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे. आरळा-उदगीरी मार्गावर वडाचे झाड पडल्याने वाहतूक अन्य मार्गे वळविली आहे. वारणा 26 टीएमसी साठा झाला आहे. चोवीस तासांत 55 मिलीमीटर तर एकुण 1851 मिलीमीटर पाऊस झाला. धरण जलाशयात 8201 क्‍युसेक पाण्याची आवक सुरु आहे. 

चंदगडला जनजीवन विस्कळीत 
चंदगड  तालुक्‍यात आज दिवसभर मुसळधार पाऊस आणि हवेतील बोचरी थंडी यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पहाटेपासूनच जोरदार सरींनी सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ओढे आणि नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली होती. जोरदार कोसळणाऱ्या सरी आणि बोचरी थंडी यामुळे शेती कामावर त्याचा परिणाम जाणवला. बाजारपेठेत शुकशुकाट होता. आज सकाळी आठपर्यंत चोवीस तासात चंदगडला 44, नागनवाडी 24, माणगाव 31, कोवाड 11, तुर्केवाडी 22 तर हेरे मंडलमध्ये 77 मिली मीटर पाऊस नोंदवला गेला. परंतु त्यानंतरही दिवसभर जोरदार पाऊस सुरुच होता. 

रोपलावणीची उडालीय धांदल 
कोवाड - संततधार पावसाने ताम्रपर्णीच्या पातळी झपाट्याने वाढली. रस्त्यावरुन लोकांची वर्दळ कमी दिसत होती. भाताच्या रोप लागणीला पाऊस फायदेशीर असल्याने लागणीची कामे जोरदार सुरू होती. शेताच्या बांधावर असलेली कांही ठिकाणची झाडं उन्मळून पडली होती. रात्री असाच जोरदार पाऊस सुरु राहिला तर मंगळवारी सकाळी ताम्रपर्णी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून कोवाड,कामेवाडी बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्‍यता आहे. 

पुनाळ परिसरात संततधार 
पुनाळ - संततधारेमुळे कासारीचे पाणी दूसऱ्यांदा पात्राबाहेर पडले. शनिवारपासून पुष्प नक्षत्र (म्हातारा पाऊस) सुरु झाले.त्याने मात्र जोरदार हजेरी लावल्याने कासारी नदीचे पाणी पुन्हा पात्राबाहेर पडले. पूराचे पाणी शेतवडीत शिरले असल्याने ऊसशेती पाण्याखाली गेली आहे. मासेमारीसाठी तरुण सरसावले आहेत. 

कोल्हापूर - अणुस्कुरा रस्ता बंद 
करंजफेण - शाहूवाडी दक्षिण परिसरात परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बर्की, पाल येथील बंधारे सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली आहेत. त्यामुळे पाल, इजोली, सावर्डी, मरळे, बर्की गावांचा संपर्क तुटला आहे. कांटे येथील वारनमळीजवळ रस्त्यावरील ओढ्यावर पाणी आल्याने कोल्हापूर- करंजफेण-अनुस्कुरा महामार्ग बंद आहे. गेळवडे येथील कासारी माध्यम प्रकल्पातून 1000 क्‍युसेस इतक्‍या वेगाने पाण्याचा विसर्ग सोडला आहे. 

सावर्डे - मागले पूल पाण्याखाली 
सातवे - धुवाधार पावसाने झोडपून काढल्याने वारणा नदीचे पातळी झपाट्याने वाढली आहे. सावर्डे-मांगले पूल आज सकाळी पाण्याखाली गेला. शिराळा आणि पन्हाळा या दोन तालुक्‍याना जोडणारा महत्त्वाचा पूल असल्याने या तालुक्‍याचा संपर्क तुटला आहे. वाहतूक बांबवडे किंवा चिकुर्डे मार्ग वळवली आहे. कांदे-सावर्डे पुलाच्या बाजूने रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains in Kolhapur 89 percent in Radhanagari Dam