टोलनाका चुकवण्यासाठी 'येथून' हाेतेय वाहतूक ! 

हेमंत पवार
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

केवळ टोल वाचण्यासाठी शहरात येणारी अवजड वाहने ही महामार्गावरूनच गेली पाहिजेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. 
- महेश काटवटे, कऱ्हाड

कऱ्हाड ः पुणे-बंगळूर महामार्गावरील तासवडे टोलनाका वाचवण्यासाठी कर्नाटकसह कोल्हापूरकडून येणारी अवजड वाहने ही कऱ्हाड शहरातून मसूरमार्गे उंब्रज फाट्यावरून महामार्गावर जावून मार्गस्थ होतात. ही अवजड वाहने शहरात आल्याने शहरातील वाहतुकीची अगोदरच विस्कटलेली घडी पुन्हा मोडत आहे. अवजड वाहनांमुळे शहरामध्ये अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळेही या टोल चुकवण्यासाठी कऱ्हाड शहरात येणाऱ्या वाहतुकीलाच "ब्रेक' लावण्याची गरज आहे. 

कऱ्हाड हे पश्‍चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती शहर आहे. येथून कोकणात आणि कर्नाटकातही महामार्गावरून जाता येते. त्याबरोबर पंढरपूर, जत, उस्मानाबाद, विजापूरलाही कऱ्हाडवरून जाता येत असल्याने येथे सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे शहरातील रस्त्यावर वाहनांचा प्रचंड ताण आहे.

त्या वाहनांमुळे सकाळी आणि सायंकाळी हमखास वाहतुकीची कोंडी ठरलेली असते. त्यात वाहतुकीचे नियम बासनात बांधून रस्त्यावर कशीही वाहने उभी करणाऱ्या वाहधारकांमुळेही वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अगोदर शहरातील रस्ते हे आकाराने छोटे आहेत. त्यामुळे शहराची अवस्था रस्ते अरुंद आणि वाहने जास्त अशी आहे. त्यातच अस्ताव्यस्त वाहनांचीही संख्या मोठी असल्याने वाहतुकीची कोंडी डोकेदुखी ठरू लागली आहे.

सकाळचे मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा

एकीकडे अशी स्थिती असताना पुणे-बंगळूर महामार्गावरील तासवडे येथील टोलनाक्‍याचे पैसे वाचवण्यासाठी कर्नाटकसह कोल्हापूरकडून येणारी ट्रकसह अवजड वाहने ही कऱ्हाड शहरातून मसूरमार्गे उंब्रज फाट्यावरून पुणे- बंगळूर महामार्गावरून मार्गस्थ होतात. मात्र, ही अवजड वाहने शहरात आल्यामुळे शहरातील वाहतुकीचे तीनतेराच वाजतात. त्यातल्या त्यात ही वाहने सायंकाळची शहरात आल्यावर तर मोठी अवघडच स्थिती होत आहे.

अवजड वाहनांमुळे वाहतुकीची घडी विस्कटत आहे

त्यामुळे अगोदरच वाहनांची गर्दी असताना त्यामध्ये या अवजड वाहनांची भर पडत असल्याने शहरातील वाहतुकीची घडी विस्कटत आहे. त्याचबरोबर ही वाहने कऱ्हाड-विटा राज्यमार्गावरील कृष्णा पूलमार्गे मसूरकडे रवाना होतात. जुना कृष्णा पूल पडला आहे. नवीन कृष्णा पुलावरून वाहनांची वाहतूक सुरू आहे. ही अवजड वाहने त्या पुलावरून जात असल्याने पुलावरील वाहतूक सातत्याने जाम होत आहे. त्याचबरोबर ही अवजड वाहने शहरात येण्याने त्यांना शहरातील दुचाकींचा अंदाज येत नसल्याने आणि दुचाकीस्वारही जागा मिळेल तेथून अवजड वाहनांच्या पुढे गाड्या काढत असल्याने अपघातांचेही प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे अशा अवजड वाहनांच्या अपघातांतही काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेही केवळ टोल चुकवण्यासाठी कऱ्हाड शहरात अवजड वाहने आणल्यामुळे होणाऱ्या वाहतुकीलाच ब्रेक लावण्याची गरज आहे. 

नागरिकांना आवाहन 

कऱ्हाड शहरात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय योजण्यासाठी काय करता येईल, याची माहिती "सकाळ' जाणून घेत आहे. त्यासाठी आपल्याला सुचणाऱ्या उपाययोजना व्हॉट्‌सऍपवर 9404380111, 9405563377 या क्रमांकावर कळवाव्यात.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy vehicles Moves From City To Miss The Toll