हेलिकॉप्टर बिघडल्याने ठाकरे मोटारीने रवाना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नगर - केडगाव येथील दुहेरी हत्याकांडातील शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर बिघडले. त्यामुळे एक तास थांबून ठाकरे यांनी मोटारीने पुण्याकडे प्रयाण केले.

नगर - केडगाव येथील दुहेरी हत्याकांडातील शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर बिघडले. त्यामुळे एक तास थांबून ठाकरे यांनी मोटारीने पुण्याकडे प्रयाण केले.

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांची गोळ्या घालून धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे नगरमध्ये आले होते. दोन्ही कुटुंबाची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर ते दुपारी मुंबईला जाण्यासाठी पोलिस मुख्यालयातील हेलिपॅडकडे रवाना झाले. उद्धव ठाकरे यांच्यासह चौघे जण हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. मात्र, हेलिकॉप्टर उड्डाण करीत नव्हते. चालकाने ते थोडेसे पुढे घेऊन पाहिले, तरीही ते उड्डाण घेत नव्हते. अखेर ठाकरे हेलिकॉप्टरमधून उतरले आणि पोलिस प्रशिक्षण सभागृहात जाऊन बसले. पायलटने प्रयत्न करूनही हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकले नाही. अखेर ठाकरे यांनी मोटारीने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे पोलिस प्रशासनासह सर्वांचीच धावपळ उडाली. तापमान वाढल्यामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण होऊ शकले नाही, असे सांगण्यात आले.

मंत्री शिवतारेंनी केले सारथ्य
हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर उद्धव ठाकरे मोटारीने पुण्याला निघाले. त्या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मोटारीचे सारथ्य केले. मोटारीत रामदास कदम, खासदार महाडिक असे मोजकेच लोक बसले होते.

पायलटची आस्थेवाईकपणे चौकशी
हेलिकॉप्टर उड्डाण घेणार नाही, हे समजल्यानंतर ठाकरे यांनी हेलिकॉप्टरजवळ जाऊन पायलट व इतर कर्मचाऱ्यांची आस्थेवाईपणे चौकशी केली. पायलट म्हणाला, साहेब, तुम्हाला सेवा देऊ शकत नाही. मेकॅनिक येईपर्यंत काही करू शकत नाही. त्यावर, "काही हरकत नाही. जेवण करा आणि व्यवस्थित दुरुस्ती करून घ्या,' असे ठाकरे म्हणाले.

Web Title: helicopter problem uddhav thackeray motor pune