मदतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 11 जुलै 2018

सातारा - शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलामुलींना मदतीचा हात पुढे करणाऱ्या धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून, या योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ द्यावी, अशी मागणी ‘सकाळ’च्या माध्यमातून सोमवारी (ता. नऊ) करण्यात आली होती. त्यानुसार येथील सहायक धर्मादाय आयुक्त ईश्‍वर सूर्यवंशी यांनी १३ जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली आहे. 

गरीब असलेल्या; परंतु शिक्षणाची आवड असलेले विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी आता येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देणार आहे. सातारा जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीला ८५ टक्केपेक्षा जादा गुण मिळाले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी सात जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन धर्मादाय आयुक्त कार्यालयाने केले होते. हा उपक्रम कौतुकास्पद असून, अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ द्यावी, या नागरिकांच्या मागणीचे वृत्त ‘सकाळ‘ने सोमवारी (ता. नऊ) प्रसिद्ध केले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालय, राजधानी टॉवर्स, राजवाडा येथे १३ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्याकडे जमा असलेल्या देणगीच्या दहा टक्के रक्कम साह्य म्हणून द्यावी. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनाही दहावी परीक्षेत ८५ टक्‍क्‍यांच्या वर गुण मिळविलेल्या गरीब कुटुंबांतील मुलामुलींची नावे कळवावीत, असे आवाहनही सहायक धर्मादाय आयुक्त सूर्यवंशी यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत शिफारस हवी
विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात केलेल्या अर्जासोबत मुख्याध्यापकांची शिफारस, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी अथवा तहसीलदारांच्या दाखला जोडणे आवश्‍यक आहे, अशी माहिती सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली.

Web Title: Help Form Sakal Ganeshotsav