फ्रान्सच्या ट्रॅकवर धावणार माणदेशची श्रेयाली शिंदे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीस मदतीचे आवाहन

म्हसवड - दुष्काळी माण तालुक्‍यातील राणंद येथील सुकन्या श्रेयाली शिंदे हिची फ्रान्समधील नॅन्से येथे इंटरनॅशनल स्कूल स्पोर्टस फेडरेशनतर्फे आयोजित वर्ल्ड स्कूल ॲथलेटिक्‍स चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी रिले क्रीडा प्रकारात भारतीय संघामध्ये निवड झाली आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीस मदतीचे आवाहन

म्हसवड - दुष्काळी माण तालुक्‍यातील राणंद येथील सुकन्या श्रेयाली शिंदे हिची फ्रान्समधील नॅन्से येथे इंटरनॅशनल स्कूल स्पोर्टस फेडरेशनतर्फे आयोजित वर्ल्ड स्कूल ॲथलेटिक्‍स चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी रिले क्रीडा प्रकारात भारतीय संघामध्ये निवड झाली आहे.

माणदेश म्हटले, की दुष्काळ पाचवीला पूजलेला. ओसाड माळरान, तहानलेली जनता, भूकेने व्याकूळ झालेली जनावरे अशा कायम दुष्काळी माणमध्ये अनेक नररत्ने जन्माला आली. त्यात ललिता बाबर हिने ऑलिंपिकपर्यंत धडक मारून माणदेशाचा डंका जगात वाजवला. आज माणमधील मुले ललिताचा आदर्श घेऊन तिच्या पावलावर पाऊल टाकत वाटचाल करत आहेत. राणंद येथील विश्वनाथ शिंदे या अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी श्रेयाली ही रयत शिक्षण संस्थेच्या पंडित नेहरू विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची, आई- वडील स्वतःच्या शेतीवर उपजीविका करता येत नाही, म्हणून मोलमजुरी करून संसाराचा रहाटगाडा चालवत आहेत. अठरा विश्व दारिद्य्र असूनही श्रेयाली जिद्दीने धावण्याचा सराव करत आहे. तिने शालेय जीवनापासूनच क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करून तालुका, जिल्हा पातळीवर उत्तुंग कामगिरी केली आहे. क्रीडा शिक्षक ज्ञानेश काळे हे तिला मार्गदर्शन करत आहेत. 

इंटरनॅशनल स्कूल स्पोर्टस फेडरेशनच्या वतीने २३ ते ३० जून २०१७ या काळावधीत फ्रान्समधील नॅन्से येथे वर्ल्ड स्कूल ॲथलेटिक्‍स चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी श्रेयालीची भारतीय संघात निवड झाली आहे. ती या स्पर्धेत रिले या क्रीडा प्रकारात प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेसाठी तिला मोठा खर्च आहे. तिला आर्थिक सहकार्य करण्यासाठी तिच्या गावातून लोकवर्गणीही काढण्यात येत आहे. वडजलचे माजी सरपंच तुळशीराम काटकर हे माण- खटाव तालुक्‍यांतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असून, कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, आमदार जयकुमार गोरे, डॉ. दिलीप येळगावकर, शेखर गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, रणजित देशमुख यांच्यासह विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींशी संपर्क करत आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्रेयालीस आर्थिक मदत करावी, असे आवाहन पालकांसह शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: help to shreyali shinde