आपल्या माणसांसाठी थेट अमेरिकेतून मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

यंदा जीवनदायिनी पंचगंगाच महापुराच्या निमित्तानं घराघरात घुसली आणि अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. अमेरिकेत हे सारे अपडेटस्‌ मिळत होते. आपल्याच मातीतील आपल्या माणसांसाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे, असा निर्धार त्यांनी केला. 

कोल्हापूर - पंचगंगेच्या साक्षीनेच ही पोरं लहानाची मोठी झाली. पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला गेली; पण यंदा जीवनदायिनी पंचगंगाच महापुराच्या निमित्तानं घराघरात घुसली आणि अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. अमेरिकेत हे सारे अपडेटस्‌ मिळत होते. आपल्याच मातीतील आपल्या माणसांसाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे, असा निर्धार त्यांनी केला. 

कुणी दहा, कुणी वीस, तर कुणी पन्नास डॉलर रक्कम जमा केली. बघता बघता ती सातशे डॉलरवर गेली आणि या पन्नास हजारांच्या रकमेचा धनादेश आज त्यांनी आपल्या पालकांच्या माध्यमातून सकाळ रिलीफ फंडाकडे सुपूर्द केला. शुभंकर संजीव पाटील, शुभम शिवाजीराव पवार, शुभम संजय चव्हाण या तीन मित्रांनी हा निधी जमा केला. संजीव पाटील, जयदीप शेळके यांनी या मदतीचा धनादेश ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्य बातमीदार सुधाकर काशीद उपस्थित होते.

शुभंकर पाटील, शुभम पवार आणि शुभम चव्हाण हे तिन्ही जिगरी दोस्त. तिघांनीही येथील डी. वाय. पाटील कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी वेस्टर्न मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. तेथे ‘कमवा आणि शिका’ योजनेतून काम करत ते शिकतात. महापुरानंतर त्यांनी किमान दोन हजार डॉलरची रक्कम पूरग्रस्तांसाठी जमा करण्याचा निर्णय घेतला; पण दरम्यान शुभंकरचा अपघात झाल्याने तो कोल्हापूरला आला. उपचारानंतर पुन्हा अमेरिकेला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी निधी संकलनाची मोहीम राबवली आणि संकलित झालेला निधी पालकांच्या खात्यावर जमा केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help from the US to sakal relief fund