ओझे वाहणाऱ्या सावित्रीच्या लेकींना दिला "आधार' 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

सोलापूर : वर्षानुवर्षे ओझं वाहून, हातपाय थकले, पोटासाठी वाहतो ओझे, जीवन जगण्याचे तेच साधन आमुचे.... गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून सोलापुरातील फलटण गल्लीत गाडा ओढण्याचे काम करणाऱ्या कोंडाबाई शिंगे, पार्वती ढावरे व काशीबाई सोनवणे या तीन ज्येष्ठ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा "आधार' मिळवून देत येथील श्री सिद्धेश्‍वर प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. 

सोलापूर : वर्षानुवर्षे ओझं वाहून, हातपाय थकले, पोटासाठी वाहतो ओझे, जीवन जगण्याचे तेच साधन आमुचे.... गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून सोलापुरातील फलटण गल्लीत गाडा ओढण्याचे काम करणाऱ्या कोंडाबाई शिंगे, पार्वती ढावरे व काशीबाई सोनवणे या तीन ज्येष्ठ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा "आधार' मिळवून देत येथील श्री सिद्धेश्‍वर प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. 

या तीन ज्येष्ठ महिलांना गेल्या वर्षी हातगाडा दिला होता. त्यावेळी, शासकीय योजनेतून मदत झाली तर बरे होईल, अशी अपेक्षा या महिलांनी व्यक्त केली. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष देविदास चेळकर यांनी पुढील वर्षापर्यंत निश्‍चित लाभ मिळवून देऊ असे आश्‍वासन दिले होते. त्याची पूर्तता उद्याच्या रक्षा बंधनाच्या पार्श्‍वभूमीवर आज (शनिवारी) करण्यात आली. 

सकाळचे आठ वाजले की, कामावर निघायचे. दिवसभरच्या काबाड कष्टातून कसेबसे 100 ते 125 रुपये सुटतात. मागणी करूनही हमालीची किंमत वाढत नाही. वाहतुकीची अनेक साधने झाल्यामुळे गाडा हाकणाऱ्यांची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या भाड्यात ओझे वाहण्याचे काम करावे लागते. आता दरमहा 600 रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने ही रक्कम आमच्यासाठी लाखो रुपयांप्रमाणे असणार आहे, अशी प्रतिक्रिया श्रीमती शिंगे यांनी व्यक्त केली. 

बाईमाणूस हातगाडी ओढते हे पाहिल्यावर अनेकांनी आमचे फोटो छापले, मुलाखती नेल्या, टीव्हीवर दाखवले. ज्या लोकांनी पाहिले त्यांनी भेटल्यावर कोरडे कौतुक केले, आमदार, पोलिसांनी सत्कार केला, पण मदतीचा हात देण्यासाठी कुणी पुढे आला नाही. कार्यक्रमात बोलायचे पण करायचे काही नाही, असे वाटत होते. मात्र या मुलांनी केलेली वचनपूर्ती पाहून आम्हाला आनंद झाला, अशा शब्दांत श्रीमती ढावरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अध्यक्ष प्रशांत फत्तेपुरकर यांच्या हस्ते अनुदान मंजुरीचे पत्र देण्यात आले. या वेळी नगरेश्वर देवस्थानचे प्रा अतुल भावटणकर, एकनाथ कुनगुलवार, सुनीता बुरकुले, रवी बिद्री, महेंद्र सोमशेट्टी, संजय देशमुख,रणजित गडमिरे, स्नेहा हळ्ळी, अनिल शहा उपस्थित होते. संतोष काबरा यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आशा मेहता यांनी केले. सुनंदा कोरे यांनी आभार मानले. 

गेल्या वर्षी या भगिनींच्या कष्टाला सलाम म्हणून हातगाडी दिल्या होत्या. त्यांनी केलेल्या मागणीनुसार अनुदान मंजुरीचे पत्र आज दिले. त्यामुळे वचनपूर्तीचे समाधान मिळाले. 
- देविदास चेळेकर, अध्यक्ष 

Web Title: help to woman on rakhi pornima