असहायतेने उभा आहे एक अंध गवा

असहायतेने उभा आहे एक अंध गवा

कोल्हापूर - आज चार दिवस झाले, हा गवा तिथेच उभा आहे. घुटमळला तर त्याच परिसरात घुटमळतो. वृद्धत्वाकडे पोचलेल्या या गव्याची दृष्टी अंधुक झाली आहे, तरीही इकडे-तिकडे जायचा प्रयत्न करू लागला, की अडखळतो, झाडाला, बांधाला धडकतो. 

त्यामुळे त्यानं कदाचित ठरवलंय, आता आहे तिथंच उभे राहायचं आणि तो तसाच उभा आहे; पण आता खरा प्रश्‍न आहे, की हतबल झालेल्या या गव्यासाठी आपण काय करणार याचा. बाजार भोगावपासून दहा किलोमीटरवर पिसात्री गावाजवळ हा गवा हतबलपणे उभा आहे. पोटाला पुरेसे न मिळाल्याने तो खंगला आहे. धडधाकट असता तर एका धडकेत झाडालाही उखडून टाकणारा तो आता केवळ शांत उभा आहे. एरवी आपण जंगलात जातो. तेथे गवा पाहायला मिळावा म्हणून उत्सुक असतो, पण येथे तर रस्त्यालगत काही अंतरावर एका खाचरात तो उभा आहे. येणारे-जाणारे त्याला बघत आहेत. लांब अंतरावर उभे राहून सेल्फी घेता येतेय का; हेदेखील काही जण पाहत आहेत; पण त्याहीपेक्षा जंगलाचे वैभव असलेल्या या गव्याला या परिस्थितीतून बाहेर काढणे किंवा त्याचे जगणे सुसह्य करण्याची गरज आहे. 

हा गवा (मादी) किमान १२ ते १३ वर्षांचा आहे. कळपातून तो बाहेर पडलेला आहे आणि वृद्धत्वाकडे झुकला आहे. काहींच्या मते तो पूर्ण आंधळा आहे तर काहींच्या मते त्याची दृष्टी धुसर झाली आहे. सोमवारी सकाळी तो पिसात्री परिसरात आला. सकाळी बिनधास्त पण वारंवार अडखळत फिरणारा गवा पाहून लोकांनी गर्दी केली. काही वेळ हा गवा झाडीत गेला; पण पुन्हा एका खाचरात येऊन थांबला, तो तेथेच थांबला.

या गव्याला दिसत नाही हे स्पष्ट झाले आहे. कारण बांधावरून तो निघाला, की दहा वेळा कोसळतो, धडपडत उठतो. आता जेथे हा उभा आहे तो परिसर रस्त्यालगत आहे. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी गर्दी  होत आहे. गर्दीच्या अस्तित्वामुळे काहीसा तो कावराबावरा आहे; पण फारशी हालचाल करायचे त्याने आज थांबवले आहे. 

या गव्याचे पुनर्वसन किंवा त्याचा सांभाळ हाच त्यावरचा उपाय आहे. काही वर्षांपूर्वी गगनबावडा येथे गव्याचे पिल्लू सापडले होते. ते भरत पाटील या अधिकाऱ्याने व शांताराम या वनमजुराने सांभाळले होते. आता याच पद्धतीने या गव्याला चारा-पाणी देऊन सांभाळावे लागणार आहे, तसे झाले तरच त्याचे अस्तिवत्व राहणार आहे. नाही तर दृष्टी नसलेला हा गवा परत जंगलात गेला तर काही दिवसांचाच साथी असणार आहे. 
 

दवंडी पिटवून जागरूकता...
या गव्याला तो आहे त्याच ठिकाणी भाजीपाला, हिरवे गवत व पाणी देणार असल्याचे वन विभागाच्या पन्हाळा क्षेत्राचे अधिकारी प्रशांत तेंडुलकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, ‘‘आसपासच्या गावांत दवंडी पिटवून या गव्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. चुकून शेजारच्या गावात हा गवा गेला तर लोकांनी गोंधळ करू नये. त्याला पळवून लावू नये, यासाठी ही उपाययोजना केली आहे. 

या गव्याला गवत, पाणी, भाजीपाला आम्ही लांबूनच दिला आहे. पाण्यासाठी सोय केली आहे. तो अंध असल्याने थेट अंगावर येत नाही पण फुसकारतो. त्यामुळे आम्ही योग्य खबरदारी घेत त्याला चारा-पाणी देत आहोत.
- रवींद्र जाधव, वनपाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com