अंध हेमंतच्या विश्‍वविक्रमी बॉडी मसाजला गर्दीत सुरवात 

Sangli
Sangli

सांगली : वयाच्या 15 व्या वर्षी हेमंतला अचानक दिसायचं बंद झालं. जगणं थांबलं... दिशाहीन झालं. अंधार दाटल्या वाटेवर पाऊल टाकायचे कुठे? प्रश्‍न मोठा होता. हेमंतला "नॅब'ने हात दिला. लख्ख उजेडात बागडणारा हेमंत अंधाराशी लढायला शिकला. तेथून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रवास सुरू झाला आणि गेले एक तप त्याने मोठ्या हिंमतीने "बॉडी मसाजर' म्हणून नाव कमावलंय. हाच हेमंत वसंत कुंभोजकर आता एका विक्रमाला गवसणी घालणार आहे. आज (शनिवार) सकाळी सात वाजता त्याने या विक्रमासाठी मसाजला सुरवात केली असून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली आहे. 

हेमंत सलग 34 तास बॉडी मसाज करून "लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' करणार आहे. वखार भागात माजी आमदार संभाजी पवार यांच्या घराच्या पिछाडीस लक्ष्मी इंजनिअरिंग वर्क्‍ससमोर शनिवारी सकाळी 7 वाजता हा उपक्रम सुरू केला. रविवारी (ता. 29) हा सायंकाळी पाचपर्यंत चालेल. अंध लढवय्यांसाठी हेमंत लढण्याची नवी वाट तयार करतोय. हा विक्रम केनियाच्या एका मसाजरच्या नावे असून त्याने सलग 24 तास मसाज केल्याची नोंद आहे. 

हेमंतचे आई-वडील नात्यातील. वैद्यकीय कारणाने त्याचा हेमंतवर काहीअंशी परिणाम झाला, लहानपणापासून त्याला कमी दिसू लागले. कालांतराने चष्मा लागला. तो पाहू शकत होता, शिकत होता, अभ्यास उत्तम सुरू होता. काही काळ मामाच्या दुकानात कामही केले, मात्र नववीत असताना शंभर टक्के अंधत्व आले. एकाककी रंग हरवून गेले. हेमंत स्वतःमध्ये हरवून गेला. हताश झाला, मात्र जगलं तर पाहिजे. त्याला नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड मिरजचा पत्ता मिळाला. तेथे त्याला आत्मविश्‍वास दिला गेला. मुंबईला चार महिने पाठवले गेले. अंधांनी कसे चालावे, एसटीतून प्रवास कसा करावा, अंदाज कसा घ्यावा आदी अतिशय महत्त्वाचे शिक्षण पूर्ण झाले. हेमंत आता अंध म्हणून जगायला सज्ज झाला होता, त्याला पायावर उभे करण्याची प्रक्रिया तेथेच सुरू झाली. सहा महिने बॉडी मसाजचे ऍक्‍युप्रेशरच्या आधारावर शास्त्रोक्त शिक्षण दिले गेले. तेथून सांगलीला परतला तो आत्मविश्‍वास घेऊन. 

गेली बारा वर्षे कुंभोजकर मसाज केंद्र उत्तमपणे चालवले. दररोज चार- पाच लोकांचे मसाज करतो, सुटीदिवशी आठ-दहा लोक होतात. जगण्याइतकी उत्तम कमाई होते, पण हेमंत इथे थांबला नाही. त्याला आता विक्रमाचे वेध लागलेत. तो आता त्यासाठी झपाटून कामाला लागला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com