समृद्ध वारसा लाभलेली भूमी आणि मुर्दाड सरकार!

श्रीकांत कात्रे 
रविवार, 16 एप्रिल 2017

सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. नैसर्गिक समृद्धता आहे. पुरातन वास्तू आणि गडकोटांसारखी प्रेरणादायी ठिकाणे आहेत. अनेक प्रतिभावंतांची जन्मभूमी किंवा कर्मभूमी जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकाने पाहवे आणि मनात साठवून जावे, अशा खूप गोष्टी इथे आहेत. एवढे सारे आहे तरीही इथे काही नाही, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. कारण आहे ते जतन करून संवर्धित करण्याच्या सर्वसाधारण मानसिकतेचा अभाव आहे. इतिहास प्रेरक असतो, आपल्याकडील संचिताचा ठेवा वृद्धिंगत करून जगणे समृद्ध करायचे असते, ही भावनाही जपण्याचा खटाटोप आपण करीत नाही. समाजातील जबाबदार पदाधिकाऱ्यांचे ना त्याकडे लक्ष आहे, ना सरकारचे!

सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. नैसर्गिक समृद्धता आहे. पुरातन वास्तू आणि गडकोटांसारखी प्रेरणादायी ठिकाणे आहेत. अनेक प्रतिभावंतांची जन्मभूमी किंवा कर्मभूमी जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकाने पाहवे आणि मनात साठवून जावे, अशा खूप गोष्टी इथे आहेत. एवढे सारे आहे तरीही इथे काही नाही, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. कारण आहे ते जतन करून संवर्धित करण्याच्या सर्वसाधारण मानसिकतेचा अभाव आहे. इतिहास प्रेरक असतो, आपल्याकडील संचिताचा ठेवा वृद्धिंगत करून जगणे समृद्ध करायचे असते, ही भावनाही जपण्याचा खटाटोप आपण करीत नाही. समाजातील जबाबदार पदाधिकाऱ्यांचे ना त्याकडे लक्ष आहे, ना सरकारचे! सरकारचा मुर्दाडपणा हा सारा वारसा नष्ट करण्यासाठी पूरक ठरणार काय, अशी भीतीही आता वाटू लागली आहे. 

जागतिक वारसा दिन मंगळवारी (ता. १८) आहे. त्यानिमित्ताने जगभर अशा समृद्ध वारशांच्या संवर्धनासाठी उपक्रम होतील. कदाचित सातारा जिल्ह्यातही होतील. सर्वांगीण वारसा लाभणाऱ्या भूमीपैकी सातारा जिल्हा एक. महाबळेश्‍वर- पाचगणी- कोयनेसारख्या ठिकाणांनी निसर्गाचा भरभरून वारसा दिला आहे. आपल्या रानफुलांच्या वैभवाने कास पठाराला तर जागतिक वारसा लाभला. प्रतापगड, अजिंक्‍यतारा, सज्जनगड असे किल्ले मनामनांत प्रेरणा जागवित आहेत. वाई, कऱ्हाड, माहुली यासारख्या कृष्णाकाठच्या गावांतील तसेच शिखर शिंगणापूर, म्हसवड, चाफळ, फलटण, धावडशी अशा क्षेत्रांची पुरातन मंदिरे अनेकांना खुणावत असतात.

कविवर्य बा. सी. मर्ढेकर, कवी गिरीश, कवी यशवंत यासारखे साहित्यिक याच भूमीत वावरले. लिंबची बारा मोटेची विहीर, मेणवलीचा घाट, त्रिपुटीचे तळे, सातारा व औंधचे वस्तूसंग्रहालय, साताऱ्याचा राजवाडा, फलटणचा मुधोजी मनमोहन राजवाडा, कऱ्हाडमधील पंताचा कोट, नकट्या रावळ्याची विहीर अशा कितीतरी वास्तू आजही त्या काळातील वैभवाची आठवण करून देतात. इथल्या गावागावांतील मंदिरे, जुने वाडे, इथली वास्तूकला, मंदिरांवरील कोरीव नक्षी, माण तालुक्‍यातील गजी नृत्य असे बरेच काही खूप काही आहे. जगाला सांगण्यासारखं आहे. दाखविण्यासारखं आहे. 
साताऱ्याच्या मातीचा अभिमान वाटावा आणि त्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यातील क्षणही उज्ज्वल करावेत, असं बरंच काही इथे आहे. हे सारं असूनही आपण त्याच्या संवर्धनाबाबतीत बेफिकीर आहोत. सोळाव्या शतकातील शेक्‍सपिअरचे घर इंग्लंडमध्ये जतन करून ठेवले आहे, अशा गप्पा आपण इथे बसून ठोकतो; पण आपल्याशेजारी असलेल्या वारशाचा आपल्याला विसर पडलेला असतो. यातील अनेक प्रेरक वास्तू, ठिकाणे अजूनही अनेकांचे आकर्षण आहे. मात्र, आज या वास्तूंची अवस्था काय आहे, किल्ल्यांची किती दूरवस्था झाली आहे, निसर्गाचा ऱ्हास किती होतोय, याचा विचार करायला कोणाला वेळ नाही. साहित्यिकांच्या स्मारकांबाबत तर उपेक्षाच. 
 

सत्तेत सरकार कोणतेही असो. आश्‍वासनांखेरीज काहीच पदरात पडत नाही, हा वेळोवेळी आलेला अनुभव. लोकप्रतिनिधींची संवेदनशीलताही गोठलेलीच. ही वारसा सांगणारी ठिकाणे आणि प्रेरक गोष्टी मते मिळवून देण्यासाठी उपयोगी थोडीच पडतात? त्यामुळे त्यांच्यालेखी या साऱ्याची किंमत शून्यच असावी. अशा वारसा आणि संस्कृती जपणाऱ्या गोष्टींचे मूल्य खूप मोठे असते. हल्लीच्या बाजाराच्या गदारोळात त्याची किंमत कदाचित नाही करता येणार; पण त्यातून जोपासली जाणारी मने समृद्ध होतात आणि जगाच्या स्पर्धेत आपली वेगळी कामगिरी करून दाखवतात, याचे मोजमाप करायला हवे. आपल्या जिल्ह्याला लाभलेल्या समृद्ध देणगीचा लाभ घेण्यासाठीचा निर्धारच यानिमित्ताने सर्वांनी करायला हवा. सर्वसामान्य लोकांना कितीही वाटले तरी त्यांच्या मर्यादा असतातच; पण लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था संघटनांनी पुढाकार घेतला तर आपला वारसा समृद्ध करण्यात आणि पर्यायाने आपल्या भावी पिढ्यांचे जगणे समृद्ध करण्यात कोणतीही अडचण भासणार नाही.

शासकीय लाजीरवाणी निष्क्रियता 
जागतिक वारसा दिन शासकीय पातळीवरही साजरा होईल; परंतु असा दिन साजरा करण्याबरोबरच शासनाने हा वारसा जपण्यासाठी खास उपाययोजना करण्याची गरज आहे. वानगीदाखल अजिंक्‍यतारा किल्ल्याचे उदाहरण घेतले, तरी शासनाची उदासिनता लक्षात येऊ शकते. या किल्ल्याच्या विकासासाठी २००६ मध्ये शासनाने दहा लाख रुपये मंजूर केले. तथापि त्यातील एक पैसाही या कामासाठी उपलब्ध झाला नाही. शासनाची उदासिनता असली तरी सर्वसामान्य लोकांच्या मनात हा वारसा वृद्धिंगत करण्याविषयीची उपजत प्रेरणा असते. म्हणूनच ‘सकाळ’ने २०१३ मध्ये लोकसहभागातून किल्ल्याचा विकास करण्यासाठी आवाहन केले आणि अक्षरशः हजारो हातांनी या मोहिमेतून किल्ल्याचे स्वरूप पालटून टाकले. किल्ल्यावरील तळ्यांच्या विकासासाठी सव्वातीन कोटी रुपयांचा निधी या लोकसहभागाच्या पाठबळावर मिळाला. मात्र, मूळ मंजूर निधीकडे अजूनही दुर्लक्षच आहे. ‘सकाळ’च्या पुढाकारामुळे लोक अजूनही स्वयंप्रेरणेने किल्ल्यावर येऊन श्रमदान, वृक्षसंवर्धन आदी उपक्रम राबवितात.

आपापल्या परीने इतिहासाचे पान जपतात. मात्र, सरकारच्या मुर्दाड दृष्टिकोनाला अजूनही पाझर फुटत नाही, ही वस्तुस्थिती लाजीरवाणी आहे.

Web Title: Heritage Satara district